सिंधूची 'सुवर्ण' कामगिरी; वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकाविणारी पहिली भारतीय खेळाडू

वृत्तसंस्था
Sunday, 25 August 2019

या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदके झाली आहेत. ​

स्वित्झर्लंड : वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आज (रविवार) भारताच्या पी. व्ही. सिंधूनेे जेतेपदाचा दुष्काळ संपवत विजेतेपदाला गवसणी घातली. तिने प्रतिस्पर्धी जपानची खेळाडू नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा सरळ दोन सेट मध्ये फडशा पाडला. आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू बनण्याचा बहुमानही मिळविला.

या विजयासह सिंधूने 2017च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली. या स्पर्धेत सिंधूच्या नावे आता एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी पाच पदके झाली आहेत. यापूर्वी सिंधू आणि ओकुहारा यांच्यात 15 सामने झाले होते. त्यापैकी सिंधूने 8 सामन्यांत बाजी मारली आहे. पहिल्या मिनिटापासूनच सिंधूने खेळावर आपली पकड कायम राखली होती. नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटकांच्या बळावर तिने अवघ्या 16 मिनिटांत पहिला सेट 21-7 गुणांनी जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर दबावाखाली आलेल्या ओकुहाराला दुसऱ्या सेटमध्ये काही कमाल दाखविता आली नाही. त्यामुळे सिंधूने पुढच्या 20 मिनिटांत दुसरा सेटही 21-7 गुणांनी जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले. 

यावेळी सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी गणपती बाप्पा मोरया आणि वंदे मातरम् च्या घोषणांनी स्वित्झर्लंड अक्षरश: दणाणून सोडले. 

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण 9 पदकांची कमाई केली असून त्यामध्ये 3 रौप्य आणि 6 कांस्यपदकांचा समावेश आहे. यापैकी दोन रौप्य आणि दोन कांस्य पदके सिंधूच्या नावावर आहेत. 2013 आणि 2014 मध्ये कांस्यपदक तर 2017 आणि 2018 मध्ये सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. मात्र, या वर्षी सिंधूने वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. 

साई प्रणितला कांस्य
बी. साईप्रणितचे वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. जपानच्या मोमोटाविरुद्ध 41 मिनिटे चाललेल्या सामन्यात त्याला 13-21, 8-21 अशा पराभवास सामोरे जावे लागले. मात्र, वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत 36 वर्षांनंतर पदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. 1983 मध्ये बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांनी वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष एकेरीत कांस्य पदक पटकाविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: P V Sindhu won the title of BWF world Championship The first Indian to win this trophy