पाक महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा अनिश्‍चित

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार की नाही, हा प्रश्‍न असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळास आपल्या महिला संघाच्या भारत दौऱ्याच्या भवितव्याच्या प्रश्‍नानेही सतावले आहे. भारत सरकारने या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या दौऱ्याचे भवितव्य अनिश्‍चित आहे.

नवी दिल्ली / कराची : श्रीलंका क्रिकेट संघ पाकिस्तानात खेळणार की नाही, हा प्रश्‍न असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळास आपल्या महिला संघाच्या भारत दौऱ्याच्या भवितव्याच्या प्रश्‍नानेही सतावले आहे. भारत सरकारने या मालिकेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे या दौऱ्याचे भवितव्य अनिश्‍चित आहे.

विश्‍वकरंडक महिला क्रिकेट स्पर्धेची पात्रता ठरवण्यासाठी विविध संघांच्या मालिका होणार आहेत. त्यातील भारत-पाकिस्तान मालिका भारतात नोव्हेंबरमध्ये आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने या मालिकेबाबतची परवानगी यापूर्वीच मागितली आहे, पण केंद्र सरकारने याबाबतचा कोणताही निर्णय कळवलेला नाही.

भारतीय क्रिकेट मंडळाने या दौऱ्याबाबत काहीही कळवलेले नाही. भारताची मालिका घेण्याची तयारीच दिसत नाही, त्यामुळे दौरा रद्द होईल, असेच दिसत आहे, असे पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. त्यांनी यासाठी भारतीय मंडळासच जबाबदार धरले.

पाकिस्तान महिला संघाच्या दौऱ्यासाठी यापूर्वीच आम्ही परवानगी मागितली आहे. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या दौऱ्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार केवळ भारतीय मंडळास नाही, हे आम्ही वेगळे सांगण्याची गरज नाही. याबाबत सरकारचा निर्णय आम्हाला मान्य करावाचा लागेल, असे भारतीय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिलांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आयसीसीने जुलै ते नोव्हेंबर हा कालावधी ठेवला आहे. पाक मंडळाने आयसीसीकडे मालिकेबाबत विचारणा केली असता आयसीसीने प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला आहे. मालिका न झाल्यास त्याचे गुण आपणास देण्याची मागणी पाक मंडळ करू शकेल, पण दौऱ्याचा निर्णय भारत सरकारच्या हाती आहे, असे सांगत भारतीय मंडळ आव्हान देऊ शकेल, असेही तज्ज्ञांचे मत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pakistan awaits women's cricket team india tour decistion