
Asia Cup 2023 BCCI vs PCB : आशिया कपचं यजमानपद गेल्यानं पाकिस्तान बिथरला; आता श्रीलंकेला दिली धमकी
Asia Cup 2023 PCB Threaten Sri Lanka Cricket Board : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हातून आशिया कप 2023 चे यजमान पद जवळपास गेले आहे. याबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नसली तरी आशिया कप श्रीलंकेत खेळवण्याच्या जोरदार हालचाली एशियन क्रिकेट काऊन्सिलने सुरू केल्या आहेत. मात्र या सर्व घडामोडीमुळे बिथरलेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंका क्रिकेट संघटनेलाच धमकी देण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने श्रीलंकेसोबची द्विपक्षीय वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे. पीसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेने आपल्या देशात आशिया कप 2023 चे आयोजन करण्यामध्ये रस दाखवला. त्यामुळे आता पीसीबी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या संबंधामध्ये कटूता आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'श्रीलंका आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये कटूता आल्याचे एक उदाहरण म्हणजे पीसीबीने श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणारी वनडे मालिका खेळण्यास नकार दिला आहे.' पाकिस्तानला आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढच्या सर्कलनुसार या वर्षी जुलै महिन्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेत जायचं आहे.
श्रीलंकेनं या दोन कसोटी मालिकांसोबतच तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्याचा प्रस्ताव पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर ठेवला होता. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने सुरूवातीला यावर विचार करतो असं सांगितलं आणि आता हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.
यावरून श्रीलंका सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कपचे यजमानपद भूषवण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेच्या या प्रस्तावानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड श्रीलंकन क्रिकेट बोर्डावर नाराज झाल्याचं स्पष्ट होतय. ठरल्यानुसार यावेळचा आशिया कप पाकिस्तान आयोजित करणार होता. मात्र भारताने पाकिस्तानात सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास स्पष्ट नकार दिल्याने आता आशिया कप पाकिस्तान ऐवजी श्रीलंकेत खेळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.