World Cup 2019 : निसटत्या विजयाने पाकिस्तान तरले; पंचांचे चुकीचे निर्णय पथ्यावर 

वृत्तसंस्था
Sunday, 30 June 2019

उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची लढाई तीव्र होत असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानकडून आलेले पराभवाचे संकट कसेबसे दूर केले. अवघे दोन चेंडू आणि तीन विकेटने विजय मिळवला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्‍त्यात चौथ्या स्थानी मजल मारली.

वर्ल्ड कप 2019 : लीडस्‌ : उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याची लढाई तीव्र होत असताना पाकिस्तानने अफगाणिस्तानकडून आलेले पराभवाचे संकट कसेबसे दूर केले. अवघे दोन चेंडू आणि तीन विकेटने विजय मिळवला आणि विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्‍त्यात चौथ्या स्थानी मजल मारली. इमाद वसिम आणि वाहेब रियाझ यांनी 18 चेंडूत केलेली नाबाद 24 धावांची भागीदारी त्यांचे तारू पैलतीरावर नेणारी ठरली. 

गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानने अफगाणिस्तानला 227 धावांत रोखले होते. हे आव्हान त्यांच्यासाठी कठिण नव्हते, पण तोपर्यंत पोहचेपर्यंत पाकिस्तानची दमछाक झाली. डावाच्या मध्यावर गमावलेले विकेट त्यांना अधिक संकटात नेणाऱ्या ठरल्या. बघता बघता पराभवाचे ढग गडद झाले. 

प्रमुख सहा फलंदाज 156 धावांत बाद झाले होते. 10 चेंडूत 10 आणि सहा चेंडूत सहा अशी श्‍वास रोखून धरणारी स्थिती निर्माण झाली होती, पण 54 चेंडूत 49 धावा करणारा इमाद आणि 9 चेंडूत 15 धावा करणारा वाहेब यांनी अनुभव पणास लावला त्याचवेळी अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दडपण सहन झाले नाही. क्षेत्ररक्षणात चुक झाली धावचीतची संधी गमावली आणि त्यांच्या हातून सामना निसटला. 

सूमार पंचगिरीही अफगाणिस्तानला विजयापासून दूर नेणारी ठरली. पण डिआरएस चुकीच्या वेळी वापरून वाया घालवल्यामुळे अफगाणिस्तानला गरज असताना डिआरएस शिल्लक नव्हता. सलामीवीर फकर झमान शुन्यावर बाद झाल्यावर इमाम उल हक आणि बाबर आझम यांच्या 72 धावांच्या भागीदारीपर्यंत पाकची योग्य वाटचाल सुरु होती, पण मुजीब आणि नबी यांनी डावाच्या मध्यावर पाकच्या मधल्या फळीला संकटात टाकले होते. 

तत्पूर्वी, लख्ख सूर्यप्रकाश आणि फलंदाजीस उपयुक्त खेळपट्टी अशी संधी असताना नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण वर्चस्व पाकिस्तानी गोलंदाजांचे राहिले. रेहमत शाह आणि कर्णधार गुलबदीन नईब यांनी बऱ्यापैकी सुरुवात केली असली, तरी शाहिनने सुरुवातीला दोन दणके देत त्यांची दोन बाद 27 अशी अवस्था केली त्यानंतर त्यांचा डाव अडखळत राहिला. 

नजिबुल्हा झद्राननेही 42 धावा केल्या, पण त्यानेही अशगरसारखी चूक करून विकेट गमावली. त्यानंतर अफगाणिस्तानच्या तळाच्या फलंदाजांना शाहिन, वाहेब यांचा तिखट मारा झेलणे कठीण गेले. शिनवारीच्या 19 धावा त्यांना दोनशेच्या पलीकडे नेणाऱ्या ठरल्या. 

संक्षिप्त धावफलक ः अफगाणिस्तान 50 षटकांत 9 बाद 227 (रेहमत शाह 35- 43 चेंडू, 5 चौकार, अशगर अफगाण 42- 35 चेंडू, 3 चौकार, नजिबुल्हा झद्रान 42- 54 चेंडू, 6 चौकार, इमाद वसिम 10-0-48-2, शाहिन आफ्रिदी 10-0-47-4, वाहेब रियाझ 8-0-29-2) पराभूत वि. पाकिस्तान ः 49.4 षटकांत 7 बाद 230 (इमाम उल हक 36 -51 चेंडू, 4 चौकार, बाबर आझम 45 -51 चेंडू, 5 चौकार, इमाद वसिम नाबाद 49 -54 चेंडू, 5 चौकार, वाहेब रियाझ नाबाद 15 - 9 चेंडू, 1 चौकार, 1 षटकार, मुजीब उर रेहमान 10-1-34-2, महम्मद नबी 10-0-23-2) 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pakistan wins against Afghanistan by 3 wickets in World Cup 2019