IND vs PAK WC 2023 : भारत-पाक सामन्यात भेटणार दुरावलेली कुटुंबं! पहिल्यांदाच नातीचं तोंड पाहणार हसन अलीचे सासरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs PAK WC 2023

IND vs PAK WC 2023 : भारत-पाक सामन्यात भेटणार दुरावलेली कुटुंबे! पहिल्यांदाच नातीचं तोंड पाहणार हसन अलीचे सासरे

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०२३ हा भारतात खेळला जाणार आहे. ज्यासाठी क्रीडा जगतात मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. यादरम्यान सर्वांचं लक्ष लागलं आहेत ते टीम इंडिया आणि पाकिस्तान याच्यामध्ये अहमदाबाद येथे १४ ऑक्टोबक २०२३ रोजी होणाऱ्या सामन्याकडे...

एकीकडे क्रिकेट चाहते या हाय व्होल्टेज सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे हरियाणामध्ये राहणारे लियाकत खान हे आपली मुलगी आणि नातवंडाच्या भेटीसाठी आतुर झाले आहेत.

पाकिस्तानचा क्रिकेटपटू हसन अली याचे सासरे या सामन्यादरम्यान पहिल्यांदाच आपल्या दोन वर्षांच्या नातवंडाला भेटणार आहेत. हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील सेवानिवृत्त ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर लियाकत खान यांची मुलगी सामिया हिचे २०१९ मध्ये दुबईत पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हसन अलीशी लग्न झाले आहे. या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. मात्र लग्नानंतर हसन अलीची पत्नी आजतागायत सीमेपलीकडून भारतात येऊ शकली नाहीये.

लियाकत खान यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की माझी पत्नी २०२१ मध्ये पाकिस्तानात गेली होती, तेव्हा माझ्या मुलीला पहिलं मुलं होणार होतं. आशा आहे की आम्ही अहमदाबाद येथे पुन्हा भेटू. नातवंडाला कुशीत घेण्यासाठी मी अजून वाट पाहू शकत नाही असंही चंदेनी गावात राहणारे ६३ वर्षीय खान म्हणाले.

तसे पाहता क्रिकेटर हसन अली याचा भारत दौरा निश्चित नव्हता, मात्र वेगवान गोलंदाड नसीम शाह याला अचानक दुखापत झाल्याने हसन अली याला वर्ल्डकप मध्ये खेळण्याची संधी मिळाली. आता हसन अलीचा समावेश पाकिस्तानच्या प्लेइंग ११ मध्ये करण्यात आला आहे.

लियाकत खान यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, मला वाटत नाही की सध्याच्या घडीला विराट कोहलीपेक्षा कोणीही वरचढ आहे. फॉर्म खराब होता, पण त्यांने पुनरागमन केलं आहे. तो अजूनही त्याच्या सर्वोत्तम कामगिरी करत नाहीये, परंतु बाकीच्यांपेक्षा खूप पुढे आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, मला वाटते की तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. जेव्हा मी हसनला भेटेल, तेव्हा मी त्याला विनंती करेन की त्याने आपल्या संघातील (भारत) खेळाडूंची भेट घेण्यात मदत करावी, मला विराट कोहलीसोबत फोटो काढायचा आहे आणि राहुल द्रविडचे देखील आभार मानायचे आहेत.