भारतीय आव्हान राखत कश्‍यप उपांत्य फेरीत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पहिल्या गेममध्ये दोन गेम पॉईंट वाचवलेल्या पारुपली कश्‍यपने दुसऱ्या गेममध्ये गुणांचा धडाका चालवला आणि कोरियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. इनचॉनला सुरू असलेल्या या स्पर्धेत कश्‍यप आता जागतिक विजेत्या केंतो मोमोता याला आव्हान देईल.

मुंबई : पहिल्या गेममध्ये दोन गेम पॉईंट वाचवलेल्या पारुपली कश्‍यपने दुसऱ्या गेममध्ये गुणांचा धडाका चालवला आणि कोरियन ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. इनचॉनला सुरू असलेल्या या स्पर्धेत कश्‍यप आता जागतिक विजेत्या केंतो मोमोता याला आव्हान देईल.

कोरिया ओपन स्पर्धेत यंदा पी. व्ही. सिंधू, साईना नेहवाल, जागतिक ब्रॉंझ विजेता साई प्रणीत सलामीच्या फेरीनंतरच स्पर्धेबाहेर होत असताना कश्‍यपने भारतीय आव्हान कायम राखले. त्याने डेन्मार्कच्या यान ओ जॉर्गनसनला 24-22, 21-8 असे हरवले. या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलेला कश्‍यप हा तिसरा भारतीय ठरला आहे. यापूर्वी अजय जयराम (2015) आणि पी. व्ही. सिंधू (2017) यांनी ही कामगिरी केली होती.

कश्‍यपने पहिल्या गेममध्ये 8-11, पिछाडी भरून काढताना 13-12 आघाडी घेतली, पण त्यानंतरही आघाडी सातत्याने बदलत होती. त्याचे क्रॉस कोर्ट स्मॅश प्रभावी ठरू लागले होते, पण त्याचवेळी जॉर्गनसनचे ड्रॉप्सही निर्णायक ठरत होते. त्याने सलग दोन गेम पॉईंटस्‌ मिळवले, पण कश्‍यपने हे वाचवत अखेर गेम जिंकला. पहिला गेम जिंकल्यामुळे कश्‍यपचा आत्मविश्‍वास उंचावल्याचे दिसू लागले. त्याचे आक्रमण जास्त प्रभावी झाले. शॉटस्‌मध्येही अचूकता आली आणि निर्णय स्पष्ट होत गेला.

पहिल्या गेमच्यावेळी जास्त नर्व्हस होतो. त्यामुळे असेल कदाचित, पण वर्चस्वासाठी जास्त आतुर झालो होतो. त्यामुळे गुण जिंकतानाच गमावलेही जात होते. हा गेम जिंकल्यामुळे दडपण दूर झाले. दुसऱ्या गेममध्ये मुक्तपणे खेळलो, रिलॅक्‍सही होतो, त्यामुळे हा गेम सोपा झाला.
- पारुपली कश्‍यप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: parupali kashyap in semi final