Pro Kabaddi 2019 : प्रदीप, नीरजचा 'पायरेट्स' मारा 'पलटण'वर पडला भारी!

वृत्तसंस्था
रविवार, 15 सप्टेंबर 2019

प्रदीपने चढाईमधील आणखी एक सुपर टेन आणि नीरज कुमारने पकडीचे केलेले 'डबल हाय फाइव्ह' पुणेकरांना झेपले नाहीत. या दोघांच्या धडाक्‍यापुढे पुण्याचे खेळाडू साफ निष्प्रभ झाले.

प्रो-कबड्डी : पुणे : गुजरात संघाला हरवून घरच्या मैदानावर विजयी सुरवात करणाऱ्या पुणेरी पलटण संघाला प्रो-कबड्डीच्या सातव्या मोसमात रविवारी (ता.15) पाटणा पायरेट्‌स संघाकडून 33-55 अशी शरणागती पत्करावी लागली. 

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात रविवारी झालेल्या सामन्यात खरेतर प्रदीप नरवाल आणि नीरज कुमार या दोघांनीच पुणे संघाला हरविले. प्रदीपने चढाईमधील आणखी एक सुपर टेन आणि नीरज कुमारने पकडीचे केलेले 'डबल हाय फाइव्ह' पुणेकरांना झेपले नाहीत. या दोघांच्या धडाक्‍यापुढे पुण्याचे खेळाडू साफ निष्प्रभ झाले. 

पहिल्या सामन्यात विजय मिळविल्याने पुणे संघाकडून अधिक चांगल्या खेळाची अपेक्षा होती. मात्र, प्रदीपने सुरवातीपासूनच गुजरातविरुद्ध भक्कम राहिलेला त्यांचा बचाव खिळखिळा केला. पूर्वार्धातच त्याने "सुपर टेन' कामगिरी करीत सामन्याचा निकाल पाटणा संघाच्या बाजूने झुकवला होता. विश्रांतीलाच पाटणा संघाने यंदाच्या मोसमातील सर्वांत मोठी 17-27 अशी आघाडी घेतली. 

- INDvSA : धरमशालात कोसळधार; पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

विश्रांतीला पत्करावी लागलेल्या मोठ्या पिछाडीमुळे उत्तरार्धात पुणे संघाच्या खेळाडूंचा आत्मविश्‍वास गमाविल्याचेच चित्र होते. एकामागून एक असे आणखी दोन लोण त्यांना स्वीकारावे लागले. त्यातल्या त्यात त्यांना चढाईच्या आघाडीवर 25-26 अशा एका गुणाच्या पिछाडीचे समाधान लाभले. मात्र, बचावात ते 8-18 असे मागे राहिले.

प्रदीपच्या चढायांमुळे त्यांचा बचाव इतका खिळखिळा झाला होता, की उत्तरार्धात चढाई करताना पाटणा संघाच्या अभावाने चढाई करणाऱ्या हादीनेही चार गुणांची कमाई केली. प्रदीपचे तुफान, नीरजची बचावाची भिंत आणि चार लोण, अशा चौफेर कामगिरीसह पाटणा संघाने गुणांचे अर्धशतक साजरे करीत विजय मिळविला. नीरजने 11 गुणांची कमाई करताना प्रो कबड्डीच्या इतिहासात बचावाचे सर्वाधिक 11 गुण मिळविण्याचे मनजित चिल्लरच्या विक्रमाची बरोबरी केली.  

दिल्लीचा विजय 
त्यापूर्वी, पुन्हा एकदा नवीन कुमारच्या चढायांनी दिल्ली संघाची दबंगगिरी कायम राखली. त्याच्या सलग तेराव्या 'सुपर टेन' कामगिरीने दबंग दिल्ली संघाने गुजरात फॉर्च्युन जाएंट्‌स संघाचे आव्हान 34-30 असे मोडून काढले. रोहित गुलियाच्या चढायांनी गुजरातने उत्तरार्धात उचल घेतली होती. पण, त्यांना नवीनला रोखण्यात अपयश आले, हेच त्यांच्या पराभवाचे कारण ठरले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patna Pirates demolish Puneri Paltan in Pro Kabaddi 2019