पाक संघावरच बंदी घाला; न्यायालयात चाहत्याची याचिका

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 18 June 2019

- क्रिकेटप्रेमीने दाखल केली याचिका.

बुधवारी मंडळाची बैठक

लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही, तसेच सुनावणीची तारीखही समजू शकली नाही. 

"समा' वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार गुजरानवाला दिवाणी न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. त्यात इंझमाम उल हक याच्या नेतृत्वाखालील निवड समितीसुद्धा बडतर्फ करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

बुधवारी मंडळाची बैठक

दरम्यान, "पीसीबी'च्या प्रशासकीय मंडळाची बुधवारी लाहोरमध्ये बैठक होणार आहे. त्यात संघव्यवस्थापनात बदल करण्याबाबत मोठे निर्णय होण्याची अपेक्षा आहे. हे वृत्त "जिओ न्यूज'ने दिले आहे. प्रशिक्षण दल आणि निवड समिती यांच्यातील अनेक सदस्यांना निरोप दिला जाईल. यात प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा समावेश असेल. त्यांचा करार वाढवायचा नाही असे मंडळाने यापूर्वीच ठरविले आहे.

संघ व्यवस्थापक तलत अली, "बोलिंग कोच' अझर मेहमूद आणि संपूर्ण निवड समिती बडतर्फ केली जाईल. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक वसीम खान परदेश दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतले आहेत. ते या बैठकीला उपस्थित राहतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Petition Filled To ban on Pak Team