esakal | नरेंद्र मोदींनी ठरवलं तर पाक क्रिकेट संपून जाईल : रमीझ
sakal

बोलून बातमी शोधा

ramiz raja

नरेंद्र मोदींनी ठरवलं तर पाक क्रिकेट संपून जाईल : रमीझ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाहोर : एकीकडे पाकिस्तानमधील क्रिकेट मालिका इतर देशांनी रद्द केल्यास भारतास जबाबदार धरले जाते आणि दुसरीकडे भारताने ठरवलं तर पाकिस्तानमधील क्रिकेट भारत संपुष्टात आणू शकते, असे जाहीर मत व्यक्त केले जाते... पाकिस्तान क्रिकेटची अशा प्रकारची व्यथा त्यांच्या मंडळाचे नवे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू रमीझ राजा यांनी व्यक्त केली.

रमीझ राजा यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नावाचा उल्लेख केला आणि तोही पाकिस्तान सिनेटच्या स्टँडिंग मिटिंगमध्ये. मोदींनी ठरवलं तर आयसीसीकडून पाकिस्तानला कोणतेही आर्थिक साह्य मिळू शकत नाही आणि तसे झाले तर पाकिस्तान क्रिकेट संपून जाईल, असे राजा यांनी जाहीरपणे म्हटले आहे.

पाकिस्तान मंडळाला आयसीसीकडून ५० टक्के आर्थिक साह्य मिळते. आणि आयसीसीला ९० टक्के पैसा हा भारतीय व्यावसायिकांकडून मिळतो. पाकिस्तान क्रिकेटला कोणतेही आर्थिक साह्य मिळू नये, असे मोदींनी ठरवले तर पाकिस्तानचे क्रिकेट कोलमडून पडेल, असे रमीझ राजा म्हणतात.

सिनेटच्या स्टँडिंग मिटिंगमध्ये आपली ही भावना व्यक्त करण्यापूर्वी राजा यांनी गेल्या आठवड्यापासून हाच सूर लावलेला आहे. आयसीसीकडून येणारे साह्य अचानक थांबले तर मोठी अडचण येऊ शकते, त्यासाठी पाकिस्तानी उद्योगपतींनी पुढे येऊन पाकिस्तानला सुपरपॉवर बनवण्यासाठी मदत केली पाहिजे, असे आर्जव त्यांनी पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजमध्ये पाक उद्योगपतींशी बोलताना केले होते.

दरम्यान, येत्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीसाठी पाकिस्तानमध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ मालिका खेळणार होते; परंतु सुरक्षिततेच्या कारणावरून न्यूझीलंडने मालिका सुरू होण्याच्या काही तास अगोदर माघार घेतली. त्यानंतर इंग्लंडनेही दौरा रद्द केला. याचा मोठा आर्थिक फटका पाकिस्तान क्रिकेट मंडळाला बसला, परंतु पाकिस्तानच्या काही मंत्र्यांनी याचे खापर भारतावर फोडले होते.

loading image
go to top