आफ्रिकेला कडव्या सरावापासून भारताने रोखले

वृत्तसंस्था
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

भारतीय अध्यक्षीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रत्यक्ष सामन्यात दर्जेदार गोलंदाजीचा सराव करण्यापासून रोखले. पहिल्या कसोटीसाठी संघात आलेला उमेश यादव, इशान पोरेल आणि भेदक सुरुवात केलेला शार्दूल ठाकूर यांना अनुकूल वातावरणात गोलंदाजीपासून दूर ठेवण्याची हुशारी भारतीयांनी दाखवली.

विझियानगारम : भारतीय अध्यक्षीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना प्रत्यक्ष सामन्यात दर्जेदार गोलंदाजीचा सराव करण्यापासून रोखले. पहिल्या कसोटीसाठी संघात आलेला उमेश यादव, इशान पोरेल आणि भेदक सुरुवात केलेला शार्दूल ठाकूर यांना अनुकूल वातावरणात गोलंदाजीपासून दूर ठेवण्याची हुशारी भारतीयांनी दाखवली.

पहिल्या 12 षटकांतच दक्षिण आफ्रिकेची अवस्था 2 बाद 33 अशी झाली होती. पण, त्यानंतरही ही अवस्था करणाऱ्या उमेश यादव आणि इशान पोरेलला तसेच दक्षिण आफ्रिकेस धावांपासून वंचित ठेवत असलेल्या शार्दूलला जास्त षटके देणे भारतीय संघव्यवस्थापनाने टाळले. त्याचा फायदा ऐदान मार्करम याने नाबाद शतक करून घेतला. त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेस फाफ डू प्लेसिसचे अपयश जास्त सलत असेल.

प्रथम श्रेणीचा दर्जा नसलेल्या या सामन्यात पहिल्या कसोटीसाठी निवडलेला उमेश यादव कशी कामगिरी करतो याकडे लक्ष होते. शार्दूल ठाकूरने धावांची कंजुषी करीत आणलेल्या दडपणाचा फायदा उमेश यादवने घेतला. त्याच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर डीन एल्गर स्लीपमध्ये टिपला गेला.

इशानच्या आत आलेल्या चेंडूवर थेऊनिस डे ब्रुईन चकला. सुरुवातीच्या षटकानंतर शार्दूलकडून धावा दिल्या गेल्या होत्या; तर अवेश खानचा प्रभावच पडला नाही. त्याला 10 षटके दिली गेली. अष्टपैलू जलज सक्‍सेनास उमेश यादवइतकीच म्हणजे सात षटके गोलंदाजी दिली, तर अंतिम संघ निवडीच्या स्पर्धेतही नसलेल्या धर्मेंद्रसिंह जडेजाची 10 षटकांची फिरकी वापरण्यात आली.

भारत अ विरुद्धच्या मालिकेत खेळल्याचा फायदा घेत मार्करमने शतक केले. तेम्बा बावुमाने अर्धशतक केले. दोघांनी शतकी भागी केली. झुबायर हमझाने आक्रमक सुरुवात केली, पण तो जास्त खेळण्यापूर्वी मार्करमने प्रमुख गोलंदाजांचा सामना केला होता.

संक्षिप्त धावफलक - दक्षिण आफ्रिका, पहिला डाव ः 50 षटकांत 4 बाद 190 (ऐदान मार्करम निवृत्त 100 - 118 चेंडूत 18 चौकार आणि 2 षटकार, झुबायर हमझा 22 - 26 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकार, तेम्बा बावुमा 55 - 92 चेंडूत 9 चौकार, उमेश यादव 7-0-31-1, शार्दूल ठाकूर 10-3-34-0, इशान पोरेल 6-1-11-1, अवेश खान 10-1-44-0, जलज सक्‍सेना 7-1-26-0, धर्मेंद्रसिंह जडेजा 10-1-52-2)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: president's XI did not give much practice to africa batsman