रनिंगसाठी ट्रेनिंग अन्‌ पुणे हेल्थ डेचे स्वागत !

Pune Half marathon
Pune Half marathon

पुणे - नऊ डिसेंबर रोजी होत असलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यापूर्वी पद्धतशीर तयारी करता यावी म्हणून धावण्याचे शास्त्रशुद्ध ट्रेनिंग दिले जात आहे. व्यावसायिक धावपटूंचाही सहभाग असलेल्या या शर्यतीत सहभागी होऊन पुणेकरांनी नऊ डिसेंबर रोजी सुदृढ जीवनशैलीची मुहूर्तमेढ रोवावी असा उद्देश आहे. त्यासाठी नऊ डिसेंबर हा दिवस पुणे हेल्थ डे म्हणून साजरा करावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे. या उपक्रमाचे क्रीडाच नव्हे, तर समाजातील विविध घटकांनी स्वागत केले आहे.

धावणे हा केवळ खेळाडूच नाही, तर  सुदृढ शरीर राखण्यासाठी प्रत्येकासाठी उपयुक्त व्यायाम आहे. खेळाडूसाठी तर धावणे आवश्‍यकच आहे. कारण खेळ सुटल्यानंतर त्याला आपले शरीर सांभाळण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते आणि ते काम धावण्यामुळे सुकर होते. मॅरेथॉन किंवा दौद अशा सामूहिक उप्रकमाने वैयक्तिक आरोग्य चांगले राखण्याची गोडी लागते. सगळे कुटुंब एकत्र येते, असे प्रयोग व्हायलाच हवेत. या वेळी तर मॅरेथॉन धावण्यापूर्वी घ्यावयाची काळजी याबाबत मिळालेल्या टिप्स सर्वसामान्यांमध्ये धावण्याची आवड निर्माण करण्यात उपयुक्त ठरतील.
- शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू

स्वतः तायकांदो-कराटे खेळाचा ब्लॅक बेल्ट मिळविलेला असून व्यायामाचे महत्त्व मी जाणून आहे. आमच्या मंडळाने क्रीडा ग्रंथालय सुरू केले असून व्यायामाचा प्रसार करण्याचे काम केले आहे. ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाने ९ डिसेंबरला आरोग्य दिन साजरा करण्याचे ठरविले असून वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. तसेच ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमुळेही व्यायामाबाबत सकारात्मक वातावरण तयार होईल. या उपक्रमाला माझ्या सक्रिय शुभेच्छा.
- उदय जगताप, अध्यक्ष, आदर्श मित्र मंडळ

चांगल्या प्रकृतीला व्यायाम हवा ही बाब खरी असली तरी तो सहज-सुलभ हवा. हसण्यासारखा सोपा व्यायाम नसल्याने हास्य क्‍लबची स्थापना आम्ही केली. औषधाशिवाय बरे होण्यासाठी एकत्र येणे हा उपाय आहे. हास्य क्‍लबचे १६० गट आता आहेत. नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साह येण्यासाठी मॅरेथॉन हेही प्रभावी माध्यम ठरते. त्यामुळेच आम्ही मॅरेथॉनच्या सहा किलोमीटरच्या प्रकारात मोठ्या संख्येने येऊ.
- विठ्ठल काटे, हास्य क्‍लब संकल्पनेचे पदाधिकारी

धावणे आणि तेही वेगवेगळ्या वेगात हा आमच्या हॉकी खेळाचा अविभाज्य भागच आहे. ऑन दी बॉल रनिंग जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच ऑफ दी बॉल रनिंग. त्यामुळे रनिंग हा आमच्या वर्कआउटचा अविभाज्य भागच आहे. त्याविना खेळ होऊ शकणार नाही, तसेच आमचा वर्कआउटही. साठ मिनिटे सतत धावणे आवश्‍यकच असते. त्या वेळी किती कौशल्य दाखवता त्यावर यशापयश ठरते. त्यामुळे आमच्या ट्रेनिंगमध्येही धावण्याच्या वेगवेगळ्या प्रकाराचा अंतर्भाव असतो. तंदुरुस्ती उंचावण्यासही त्याचा फायदा होतो 
- मनप्रीत सिंग, भारतीय हॉकी कर्णधार

बास्केटबॉल हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वेगवान खेळ आहे. त्याच्या सरावात रनिंग अविभाज्यच असते. आम्ही रोज चाळीस मिनिटे तरी धावण्याचा सराव करतो. त्यात अचानक वेगात धावणे, हळू धावणे यावरही भर असतो. धावण्याने स्टॅमिना तर वाढतोच; पण त्याचबरोबर प्रतिक्षिप्त क्रिया सहज तसेच वेगाने होण्यासही मदत होते. त्याचा उपयोग गुण मिळवण्यासाठी आवश्‍यक अचूकता साधण्यासही होतो. आक्रमणानंतर आपल्यावर होणारे आक्रमण रोखण्यासाठीही तेवढ्याच वेगाने परत यावे लागते. तिथेही वेग महत्त्वाचा ठरतो.
- मनीषा डांगे, शिवछत्रपती विजेती बास्केटबॉल खेळाडू

सुरवातीस मी सर्व खेळ खेळत होते, त्या वेळेपासून मी रनिंग करीत आहे. मात्र आता ॲथलेटिक्‍स करीत असताना जेवढे रनिंग करीत असते, तेवढे तर आत्ता नक्कीच करीत नाही. मात्र, त्यानंतरही आठवड्यातून तीन दिवस रनिंग करते. ते तीन किलोमीटरचे असते. धावण्याचा मला जास्त उपयोग माझी ताकद वाढवण्यासाठी होतो. शूटिंगमधील सर्वांत प्राथमिक भाग असलेले पिस्तूल योग्य प्रकारे हातात धरण्यासाठी तसेच ते स्पर्धा कालावधीत पूर्णवेळ पेलण्यासाठी आवश्‍यक असलेली तंदुरुस्ती मला त्यातून मिळते. 
- मनू भाकर, विश्वकरंडक विजेती नेमबाज

खेळायला सुरवातच होते ती मुळात धावण्यापासून. कुठलाही खेळ करणारा खेळाडू असो त्याच्या क्रीडा जीवनातील व्यायामाची सुरवात ही धावण्यापासूनच होते. एक परिपूर्ण व्यायाम म्हणूनच धावण्याकडे बघितले जाते. कबड्डीतील चपळता राखण्यासाठी प्रत्येक कबड्डीपटूला धावण्याचा सराव करावाच लागतो. खेळाडूस धावण्याचे मार्गदर्शन मिळत असते. रोजच्या जीवनात आपण धावायला सुरवात करतो तेव्हा नुसतेच धावणे बरोबर नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन धावण्यास सुरवात करावी. प्रत्येकाच्या शरीराची एक ठेवण असते, त्याला पेलेल असा प्रकारेच धावण्याचे नियोजन करावे. त्याचबरोबर विविध पातळ्यांवर आयोजित होणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये आवर्जून सहभागी व्हावे. म्हणजे आपल्यालाच स्वतःच्या शारीरिक क्षमतेची कल्पना येते.
- किशोरी शिंदे, आशियाई सुवर्णपदक विजेती कबड्डीपटू, पुणे महापालिका क्रीडा आयुक्त

चालणे-धावणे यांसारख्या व्यायामांनी शारीरिक क्षमता वाढते. अशा व्यायामांनी मधुमेह, रक्तदाब, हृदयाचे आजार, हाडांचा ठिसूळपणा आदींना दूर ठेवता येते. सध्याची जीवनशैली बैठी अशा आजारांना आमंत्रण देणारी ठरते. मॅरेथॉन तसेच आरोग्यदिनाच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या अन्य उपक्रमांची आवश्‍यकता आहे. मॅरेथॉन तसेच इतर उपक्रमांमध्ये रोटरी क्‍लबच्या वतीने अधिकाधिक सहभाग आपण निश्‍चितच नोंदवू.
- डॉ. अविनाश भोंडवे, नियोजित अध्यक्ष, राज्य रोटरी क्‍लब

आरोग्याकडे सध्या दुर्लक्ष होत असल्याचे जाणवते. प्रकृती चांगली ठेवण्याच्या व्यायामाकडे गंभीरपणे पाहायला हवे. बजाज अलियांझ अर्ध मॅरेथॉन स्पर्धा आणि आरोग्य दिनानिमित्त ‘सकाळ’  माध्यमसमूह राबविणार असलेल्या इतर उपक्रमांमुळे व्यायामाची आवड जोपासण्यासाठी निश्‍चितच मदत होणार आहे. लायन्स क्‍लबचा अशा उपक्रमांना पाठिंबा तर आहेच, पण क्‍लबचे पदाधिकारी आणि सदस्य त्यात सहभागीही होतील.
- रमेश शहा, लायन्स क्‍लबचे डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर

तणावाचे व्यवस्थापन हे आधुनिक काळातील एक मोठे आव्हान आहे. व्यायाम हे त्यावरील सर्वोत्तम उत्तर असून सर्व वयोगटांतील व्यक्तींनी व्यायामाची कास धरायला हवी. भराभर चालणे, धावणे, योगोपचार आदींची गरज असून अर्ध मॅरेथॉनसारख्या उपक्रमांचा निरोगी जीवनासाठी उपयोग होईल. रोटरी क्‍लब या उपक्रमात नक्कीच सहभागी होईल.
- गिरीश देशपांडे, पुणे रोटरी रॉयल क्‍लबचे अध्यक्ष

६४ वर्षांची असली तरी दहा किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेत असते. केवळ ‘डाएटिंग’ नव्हे, तर व्यायामही महत्त्वाचा ठरतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तंबाखू-दारूपासून मुक्ती, शिस्तबद्ध आयुष्य या गोष्टींप्रमाणेच व्यायामासाठी जागृती हवी. आमच्या असोसिएशनचे डॉ. संजय पाटील, डॉ. मिलिंद केळकर, जयंत नवरंगे आदी धावण्याच्या स्पर्धांत आणि उपक्रमांत सक्रिय भाग घेतात. ‘सकाळ’ माध्यमसमूह आरोग्य दिनानिमित्ताने आयोजित करीत असलेल्या विविध कार्यक्रमांना आमचा पाठिंबा आहे.
- डॉ. पद्मा अय्यर, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष

वाढत्या प्रदूषणाने अन्न, हवा प्रदूषित होते आहे. याला तोंड द्यायचे तर स्वास्थ्य हवे. म्हणूनच व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला पाहिजे. सक्षम शारीरिक आरोग्यासाठी किमान तीस मिनिटे आणि मानसिक आरोग्यासाठी किमान तीस मिनिटे ठेवलीच पाहिजेत. शारीरिक आरोग्यासाठी मैदानी खेळांची गरज असून मॅरेथॉनसारख्या स्पर्धांनी त्याविषयीची जाणीव निर्माण होईल. अशा प्रकारच्या उपक्रमात ‘सकाळ’ने कायमच पुढाकार घेतला असून आपण त्यात निश्‍चितच सहभागी होणार आहोत.
- राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com