सिंधूवरच भारताच्या आशा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

आता खडतर आव्हान 
सिंधूची आता लढत चीनच्या हे बिंगजिआओ हिच्याविरुद्ध होईल. सिंधूचे सध्याचे मानांकन सरस आहे. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसरी आहे, तर बिंगजिआओ सातवी. दोघातील सातपैकी तीनच लढती सिंधूने जिंकल्या आहेत. मात्र दोघींतील गेल्या लढतीत सिंधूने बाजी मारली आहे. 

मुंबई - ऑलिंपिक रौप्यपदकविजेत्या पी. व्ही. सिंधूने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान कायम राखताना महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. स्पर्धेस जोरदार सुरवात केलेला अजय जयराम दुसऱ्याच फेरीत पराजित झाला. 

चीनमधील वुहान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने जपानच्या आया ओहरीचा 21-14, 21-15 असा सहज पाडाव केला. चौथ्या मानांकित सिंधूने ही लढत 40 मिनिटातच जिंकली. पुरुष एकेरीत अजय जयराम सु जेन हाओ याच्याविरुद्ध 19-21, 10-21 असा पराजित झाला. अजयने पहिल्या फेरीत पाचव्या मानांकित प्रतिस्पर्ध्यास हरवून आशा उंचावल्या होत्या. 

सिंधूला तिचा पहिल्या फेरीच्या तुलनेत झालेला सरस खेळ सुखावत होता. तिने जपानी प्रतिस्पर्धीस दोन्ही गेमच्या उत्तरार्धात संधी दिली नाही. तिने पहिल्या गेममध्ये 7-7 आणि दुसऱ्या गेममध्ये 8-8 बरोबरीनंतर आघाडी वाढवत नेली. पहिल्या गेममध्ये तिने 17-9 आणि दुसऱ्या गेममध्ये 18-11 आघाडी घेत विजय निश्‍चित केला. सिंधूने 2014 च्या स्पर्धेत ब्रॉंझ जिंकले होते, त्यापेक्षा सरस कामगिरी करण्याचा तिचा इरादा आहे. 
वुहान स्पोर्टस जिम्नॅशियम सेंटरवरील या स्पर्धेत अजयने पहिल्या गेममध्ये चांगला प्रतिकार केला. पहिल्या गेममध्ये 11-11 बरोबरीपर्यंत सतत आघाडी बदलत होती.

त्याच वेळी अजयने सलग सहा गुण गमावले आणि तो 11-16 मागे पडला; मात्र त्याने प्रतिकार कायम ठेवला. दोन गेम पॉइंटही वाचवले; पण हा गेम त्याने गमावला. दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीच्या चकमकीनंतर अजय 4-10 असा मागे पडला. त्याने प्रतिकार करीत पिछाडी 10-13 कमी केली; पण त्यानंतर सलग आठ गुण गमावल्याने त्याला हार पत्करावी लागली. दोघातील यापूर्वीच्या दोन लढतीत अजयने एक सामना जिंकला होता. 

आता खडतर आव्हान 
सिंधूची आता लढत चीनच्या हे बिंगजिआओ हिच्याविरुद्ध होईल. सिंधूचे सध्याचे मानांकन सरस आहे. सिंधू जागतिक क्रमवारीत तिसरी आहे, तर बिंगजिआओ सातवी. दोघातील सातपैकी तीनच लढती सिंधूने जिंकल्या आहेत. मात्र दोघींतील गेल्या लढतीत सिंधूने बाजी मारली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PV Sindhu reaches Badminton Asia Championships quarter-finals