सिंधू सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड बॅटमिंटन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

वृत्तसंस्था
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

थायलंडची खेळाडू रॅटचानोक इन्टानोन आणि जपानची नोझोमी ओखुरा यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला अंतिम फेरीत सिंधूशी झुंजावे लागणार आहे. 

स्वित्झर्लंड : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आज (शनिवार) चीनच्या शेन युफेईचा 21-7, 21-14 असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी गटात सिंधूने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. 

सामन्याच्या सुरवातीपासूनच सिंधूने या गेमवर आपले वर्चस्व राखले होते. तिने प्रतिस्पर्धी खेळाडू युफेईला कुठलीही संधी दिली नाही. थायलंडची खेळाडू रॅटचानोक इन्टानोन आणि जपानची नोझोमी ओखुरा यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला अंतिम फेरीत सिंधूशी झुंजावे लागणार आहे. 

सामना संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिंधू म्हणाली, ''या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्याने मी आनंदी आहे. मात्र, समाधानी नाही. कारण अजून एक सामना बाकी आहे. आणि मला तो सामना जिंकायचा आहे. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यावर सध्या लक्ष केंद्रीत करीत असून उद्याही चांगला खेळ करण्याचा मी प्रयत्न करणार आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PV sindhu storms into third successive world Championship final