
रणजी उपांत्यपूर्व फेरी आजपासून; पृथ्वी शॉच्या मुंबईचे पारडे जड
Ranji Trophy 2022 : सर्वाधिक ४१ वेळा विजेता ठरलेला मुंबईचा क्रिकेट संघ आजपासून येथे खेळवण्यात येणाऱ्या रणजी क्रिकेट करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत उत्तराखंडचा सामना करणार आहे. या स्पर्धेचा इतिहास पाहता व मुंबईच्या संघाची यंदाच्या मोसमातील कामगिरी पाहता या लढतीत मुंबईचे पारडे जड असेल, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र बाद फेरीच्या लढतीत पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणाऱ्या मुंबईने निष्काळजी खेळ करून चालणार नाही.
मुंबईच्या संघाचा साखळी फेरीत एलिट ड गटात समावेश होता. या गटामध्ये मुंबईने १६ गुण पटकावत पुढल्या फेरीत प्रवेश केला. १४ गुण मिळवणाऱ्या सौराष्ट्राचे पुढल्या फेरीतील स्थान थोडक्यासाठी हुकले. सरफराज खान (५५१ धावा), अजिंक्य रहाणे (१८५ धावा), तनुष कोटियन (१८६ धावा व ११ बळी) व शम्स मुलानी (२९ बळी) या खेळाडूंनी शानदार खेळाच्या जोरावर मुंबईला साखळी फेरीत आपला ठसा उमटवता आला
आहे.
प्रतिस्पर्ध्यांना या खेळाडूंकडून अपेक्षा
कागदावर जरी मुंबईचे पारडे जड असले, तरी उत्तराखंडनेही साखळी फेरीत अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. या संघाने ई गटातून १२ गुणांसह पहिले स्थान मिळवून बाद फेरीत प्रवेश केला आहे. डी. नेगी (१९४ धावा व ७ बळी), जय बिस्ता (२२४ धावा), के. चंडेला (२२६ धावा), मयांक मिश्रा (१६ बळी) या खेळाडूंनी उत्तराखंडसाठी मोलाची कामगिरी बजावली. या खेळाडूंकडून पुन्हा एकदा त्यांना अपेक्षा असतील. मुंबईचे आव्हान परतवून लावण्यासाठी उत्तराखंडला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. बघूया या लढतीत कोण जिंकतोय ते...
वरिष्ठ खेळाडूंची अनुपस्थिती
मुंबईच्या संघाला बाद फेरीच्या लढतीत वरिष्ठ खेळाडूंविना मैदानात उतरावे लागणार आहे. अजिंक्य रहाणेला दुखापत झाली असून, तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत यावर उपचार घेत आहे. गेल्या काही काळात प्रचंड क्रिकेट खेळणारे रोहित शर्मा व शार्दूल ठाकूर यांना विश्रांती देण्यात आली आहे. श्रेयस अय्यरची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-१० मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. तसेच, सूर्यकुमार यादव अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही. शिवम दुबेलाही दुखापत झाली आहे. या सर्व खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईचा संघ उत्तराखंडशी दोन हात करणार आहे. मुंबईच्या बाकावरील क्रिकेटपटूंचा या वेळी कस लागेल, हे निश्चित आहे.
स्टार खेळाडूही खेळणार
मुंबई - उत्तराखंड या लढतीसह बंगाल - झारखंड, कर्नाटक - उत्तर प्रदेश, पंजाब - मध्य प्रदेश यांच्यामध्ये अन्य उपांत्यपूर्व लढती होणार आहेत. गुजरात टायटन्सने आयपीएल जिंकण्याची करामत करून दाखवली होती. शुभमन गिल या संघाचा महत्त्वाचा सदस्य होता. आता तो पंजाबचे प्रतिनिधित्व करणार आहे. मध्य प्रदेशविरुद्धच्या लढतीत गिलचा समावेश हा पंजाबसाठी आत्मविश्वास उंचावणारा ठरणार आहे. यासह मनीष पांडे, देवदत्त पडीक्कल, करुण नायर, मयांक अग्रवाल, प्रसिद्ध कृष्णा, के. गौतम (सर्व कर्नाटक), प्रियम गर्ग, यश दयाल (दोन्ही उत्तर प्रदेश), रजत पाटीदार (मध्य प्रदेश) या खेळाडूंसाठीही उपांत्यपूर्व फेरीची लढत महत्त्वाची ठरणार आहे.
Web Title: Ranji Trophy 2022 Ranji Cricket Prithvi Shaw Quarterfinals Start From Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..