Ranji Trophy : करुण नायरचे दहा धावांनी हुकले शतक! तर मयंक अग्रवालचा तिसरा भोपळा

कर्नाटकविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत विदर्भाच्या ४६० धावा
Ranji Trophy Karnataka vs Vidarbha Karun Nair Marathi News
Ranji Trophy Karnataka vs Vidarbha Karun Nair Marathi Newssakal

Ranji Trophy : कधी काळी कर्नाटक संघाच्या मधल्या फळीचा कणा असलेल्या करुण नायरने कर्नाटकचीच गोलंदाजी तब्बल ३० षटके थोपवून धरली आणि विदर्भाच्या मधल्या फळीला बळकटी दिली. काही अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह मारणाऱ्या करुण नायरच्या खेळामुळे रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत विदर्भाला कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात ४६० धावा उभारता आल्या. शतकाच्या बाबतीत तो कमनशिबी ठरला. दहा धावांनी त्याचे शतक हुकले. दुसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकने २ बाद ९८ अशी मजल मारीत ही लढत रंगतदार होणार असे संकेत दिले.

कर्नाटककडून खेळणारा करुण यंदा विदर्भाकडून व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून खेळत आहे. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या सिव्हिल लाइन्स मैदानावर संयम दाखवताना त्याने काही अप्रतिम फटकेही मारले. विशेषतः कवेरप्पा व हार्दिक राजला गोलंदाजीवर केलेली फटकेबाजी नजरेत भरण्यासारखी होती. सकाळी चाचपडत खेळणारा अक्षय वाडकर बाद झाल्यावर मोहित काळेच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न नायरने केला.

मात्र, काळेही फार काळ टिकू शकला नाही. उपाहारानंतर नायर-सरवटे ही जोडी जमली. त्यामुळे नायरने धावा काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्याने हार्दिक राजच्या गोलंदाजीवर मारलेला षटकार थेट मैदानाच्या बाहेर गेला. त्यामुळे पंचांना नवीन चेंडू घ्यावा लागला. कवेरप्पाच्या गोलंदाजीवर जोरदार चौकार मारल्यानंतर झपकन आलेल्या पुढच्याच चेंडूवर तो त्रिफळाचित झाल्याने विदर्भ संघाचा डाव ४०० धावांच्या आत गुंडाळला जातो का, अशी शंका आली होती.

यश ठाकूरची कलात्मक फलंदाजी

करुण नायर बाद झाला त्यावेळी विदर्भाची ७ बाद ३८९ अशी स्थिती होती. मात्र, हर्ष दुबे व यश ठाकूरने ३० धावांची भागीदारी करून विदर्भाला चारशेच्या पार नेले. त्यात यशची फलंदाजी पाहता एखादा कसलेला फलंदाज फलंदाजी करतो आहे, असे वाटत होते. विशेषतः त्याने ‘लेग साइड' ला मारलेले दोन ‘ग्लान्स' कलात्मक फलंदाजीची साक्ष देत होते. त्याने पाच चौकारांसह ३१ धावांचे योगदान दिले. हर्ष दुबे बाद झाल्यावर उमेश यादव खेळपट्टीवर येताच स्टेडियममध्ये उपस्थित मोजक्या प्रेक्षकांनी जल्लोष केला व षटकारांची मागणी केली. उमेशनेही ही मागणी पूर्ण करताना दोन उत्तुंग षटकार खेचले. त्याने १९ चेंडूवर नाबाद २१ धावा केल्या.

मयंकचा तिसरा भोपळा

भारताकडून २१ कसोटी सामने खेळलेला मयंक अग्रवाल भोपळा न फोडता बाद झाला. रणजी करंडक स्पर्धेत तो नवव्यांदा शून्यावर बाद झाला. यंदाच्या मोसमात शून्यावर बाद होण्याची ही त्याची तिसरी वेळ होय. यापूर्वी हुबळ्ळी येथे पंजाबविरुद्धच्या सामन्यात तो दोन्ही डावात शून्यावर बाद झाला होता.

संक्षिप्त धावफलक ः विदर्भ पहिला डाव (३ बाद २६१ वरून पुढे) १४३.१ षटकांत सर्वबाद ४६० (करुण नायर ९०, १७८ चेंडू, १६ चौकार, १ षटकार, अक्षय वाडकर १६, मोहित काळे १६, आदित्य सरवटे २६, हर्ष दुबे २०, यश ठाकूर ३१, ५ चौकार, उमेश यादव नाबाद २१, १९ चेंडू, १ चौकार, २ षटकार, व्ही. कवेरप्पा ४-९९, हार्दिक राज २-८९, व्ही. कौशिक १-७०, वही. विजयकुमार १-८८, धीरज गौडा १-८९), कर्नाटक पहिला डाव २४ षटकांत २ बाद ९८ (आर. समर्थ खेळत आहे ४३, के. व्ही. अनीश ३४, एस. जे. निकीन जोस खेळत आहे २०, आदित्य ठाकरे १-२९, यश ठाकूर १-२२)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com