BANvsAFG : अफगाणी फिरकीपुढे बांग्लादेशी वाघांचे 'लोटांगण'; पहिला 'पठाणी' विजय

वृत्तसंस्था
Monday, 9 September 2019

विजयानंतर अफगाणिस्तान संघाने स्टेडियम मोकळे असले, तरी उपस्थित अफगाणिस्तानच्या मोजक्‍या प्रेक्षकांसाठी त्यांनी मैदानाला विजयी फेरी मारली.

चितगाव : पाऊस आणि खराब मैदान यजमान बांगलादेशाचा कसोटी क्रिकेट सामन्यातील पराभव वाचवू शकले नाहीत. अफगाणिस्तानने खेळ सुरू झाल्यावर अवघ्या 18.3 षटकांत बांगलादेशाचे उर्वरित चार फलंदाज बाद करून झटपट विजयावर शिक्कामोर्तब केले. सामन्यात अर्धशतक आणि 11 गडी बाद करणारा अफगाणिस्तानचा कर्णधार रशिद खान सामन्याचा मानकरी ठरला. 

चौथ्या दिवशी अफगाणिस्तानने बांगलादेशाला 6 बाद 136 असे अडचणीत आणले होते. पाऊसच बांगलादेशाचा पराभव वाचवू शकणार होता. दिवसाची सुरवात तशीच झाली. अखेरच्या दिवसातील पहिली दोन सत्रे पावसामुळे वाया गेली. 
अफगाणिस्तानचे खेळाडू काहिसे निराश दिसत होते. मात्र, अखेरच्या सत्रात खेळ सुरू झाल्यावर त्यांनी मागेपुढे बघितले नाही. झटपट बांगलादेशाचा दुसरा डाव 173 धावांवर गुंडाळत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. रशिदने आज चारपैकी तीन फलंदाजांना बाद करून 49 धावांत 6 गडी बाद केले. त्याने सामन्यात 104 धावांत 11 गडी बाद करण्याची कामगिरी केली. 

पावसाच्या तिसऱ्या व्यत्ययानंतर खेळायला सुरवात झाली, तेव्हा दिवसातील केवळ एका तासाचा खेळ शिल्लक होता. त्या वेळी झहीर खानने पहिल्याच चेंडूवर शकिब अल हसनला बाद केले. बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करण्याची चूक शकिबला महागात पडली. त्यानंतर रशिदने उर्वरित तीनही फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळात अडकवले. त्याने प्रथम मेहदी हसन मिराजला पायचित केले. त्यानंतर तैजुल पायचित असल्याचा कौल मिळविला. त्यानंतर त्याने सौम्या सरकारला झेलबाद केले. 

- धक्कादायक! मायकेल क्लार्क कर्करोगाने ग्रस्त; उपचार सुरू

विजयानंतर अफगाणिस्तान संघाने स्टेडियम मोकळे असले, तरी उपस्थित अफगाणिस्तानच्या मोजक्‍या प्रेक्षकांसाठी त्यांनी मैदानाला विजयी फेरी मारली. तसेच, अखेरच्या दिवशी पावसाच्या सततच्या व्यत्ययानंतर मैदान खेळण्यायोग्य करणाऱ्या ग्राऊंड्‌समनचे आभारही मानले. 

संक्षिप्त धावफलक :
अफगाणिस्तान 342 आणि 260 वि.वि. बांगलादेश 205 आणि 173 (शादमान इस्लाम 41, शकिब अल हसन 44, मुशफिकूर रहिम 23, रशिद खान 21.4-6-49-6, झहिर खान 15-0-59-3) 

पहिले वहिले यश :
- कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात विजय मिळविणारा रशिद खान सर्वात युवा कर्णधार 
- कर्णधारपदाच्या पहिल्याच कसोटीत अर्धशतक आणि सामन्यात दहाहून अधिक गडी बाद करणारा रशिद पहिला कर्णधार. अशी दुहेरी कामगिरी करणारा तिसरा कर्णधार. यापूर्वी इम्रान खान आणि ऍलन बोर्डर 
- दहा वेगवेगळ्या संघांकडून कसोटी क्रिकेटमध्ये पराभव पत्करावा लागणारा बांगलादेश पहिलाच संघ 
- कसोटी खेळायला लागल्यापासून पहिल्या तीन कसोटीत दोन विजय मिळविणारा अफगाणिस्तान (2018 ते 2019) ऑस्ट्रेलियानंतर दुसरा संघ (1877 ते 1879)

- रवी शास्त्री झाले मालामाल; मानधनात तब्बल 'एवढी' वाढ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashid Khan bowls Afghanistan to memorable win