
थोडक्यात
भारताचा उपकर्णधार रिषभ पंत पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानात उतरला, ज्यामुळे क्रिकेटमध्ये नियम बदलण्याची चर्चा रंगली आहे.
सध्या नियमानुसार बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही, ज्यामुळे पंतच्या जागी आलेल्या ध्रुव जुरेलला फलंदाजी करता आली नाही.
ICC लवकरच या नियमात बदल करण्याचा निर्णय घेऊ शकते.
मँचेस्टर : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिले दोन दिवस अत्यंत नाट्यमय घडामोडींनी गाजले. पहिल्याच दिवशी भारताचा उपकर्णधार रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला आणि पाय फ्रॅक्चर झालेला असतानाही तो दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका महत्त्वाच्या नियमात बदल करण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
येत्या काळात जखमी खेळाडूंसाठी बदली खेळाडूला मान्यता देण्यासंदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, अशी बातमी 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिली आहे. येत्या वर्षअखेरपर्यंत असा निर्णय होऊ शकतो.