esakal | सांगली पोलिस दलातील खेळाडू रोहितची प्रो कबड्डीत एंट्री; बंगाल वॉरिअर्स संघाची बोली
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सांगली पोलिस दलातील खेळाडू रोहितची प्रो कबड्डीत एंट्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : देशातच नव्हे तर देशाबाहेरही ‘ले पंगा’ म्हणून दंगा करणाऱ्या ‘प्रो कबड्डी’ स्पर्धेत कबड्डीनगरी सांगलीचा खेळाडू रोहित बन्ने याला गतविजेत्या बंगाल वॉरिअर्स संघाने दहा लाखाची बोली लावून घेतले आहे. रोहित हा सांगलीतील मानांकित सम्राट व्यायाम मंडळाचा खेळाडू आहे. तर प्रो कबड्डीत निवड झालेला तो जिल्हा पोलिस दलातील पहिला खेळाडू ठरला.

प्रो कबड्डीमुळे या खेळाला पुन्हा एकदा बहर आला. प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात सांगली जिल्ह्याचा स्टार खेळाडू तथा हनुमान उडी फेम काशिलिंग आडके आणि नितीन मदने यांनी चांगलाच दंगा केला. सांगलीचा दबदबा देशभर निर्माण केला. त्यांच्याबरोबर सचिन शिंगाडे, कृष्णा मदने, रवींद्र कुमावत यांनी प्रो कबड्डीत चुणूक दाखवली. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कबड्डीचा आठवा हंगाम होऊ शकला नाही. परंतू यंदा डिसेंबर महिन्यात प्रो कबड्डी स्पर्धा घेण्याची जय्यत तयारी झाली आहे. बेंगलोरमध्ये एकाच ठिकाणी सर्व सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ...तर सरकारला गुडघे टेकायला लावू ; राजू शेट्टी यांचा इशारा

प्रो कबड्डीसाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच झाला. सांगली पोलिस दलाचा खेळाडू रोहित बन्ने याला दहा लाखांची बोली लावून घेण्यात आले. रोहित हा डिफेन्डर म्हणून गेल्या आठ ते दहा वर्षात नावारूपास आला आहे. २००७ मध्ये कुमार गट, २००८ ला विद्यापीठ संघात निवड झाली. २०१२ मध्ये बीच नॅशनलमध्ये तृतीय क्रमांक मिळवून दिला. पोलिस दलात भरती झाल्यानंतर राष्ट्रीय पोलिस स्पर्धेत राज्य संघाला दोनवेळा सुवर्णपदक मिळवून दिले. २०१९ ला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघातून तो खेळला. २०१५ च्या महाराष्ट्र कबड्डी लीग स्पर्धेत सांगली रॉयल्सकडून खेळताना उपविजेतेपद मिळवून दिले.

संघात उजव्या कोपऱ्यात संरक्षण करण्यात रोहितचे कौशल्य आहे. त्याचे कौशल्य हेरूनच गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने त्याला संघात घेतले. संघाचे प्रशिक्षक बी.सी. रमेश आहेत. रोहितबरोबरच कासेगावच्या रवींद्र कुमावतला यंदा संघात घेतले आहे. रोहितला सांगली जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, सम्राट व्यायाम मंडळाचे अध्यक्ष किरण जगदाळे, आशिष जाधव, अतुल माने, शफीक जमादार,, कासिम शेख आदींचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. तसेच भाऊ गजानन बन्ने, चुलते प्रकाश बन्ने, पांडुरंग बन्ने, मामा अशोक शिंगाडे यांची प्रेरणा मिळाली.

loading image
go to top