रोहित शर्मा कसोटीतही सलामीस?

वृत्तसंस्था
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले.

नवी दिल्ली : केएल राहुलची अपयशाची मालिका चिंताजनक आहे. त्यामुळे आता कसोटीतही रोहित शर्माला सलामीला पाठवण्याचा विचार होत असल्याचे संकेत निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी दिले.

रोहित मर्यादित षटकांच्या लढतीत सलामीला यशस्वी ठरला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके केली आहेत; तर ट्‌वेंटी-20 मध्ये चार शतके. मात्र, कसोटी संघातील त्याचे स्थान अद्याप अनिश्‍चित आहे.

विंडीजमधील दोन कसोटीसाठी रोहीतची अंतिम संघात निवड झाली नव्हती. रोहित मधल्या फळीसाठी योग्य मानला जात होता, पण अजिंक्‍य रहाणे तसेच हनुमा विहारीच्या विंडीजमधील यशामुळे रोहितचा आता मधल्या फळीसाठी विचार होणार नाही. तो सलामीला खेळू शकेल.

सहा वर्षांपूर्वी (2013) रोहितला एकदिवसीय लढतीत सलामीला खेळवण्याचे ठरले. तेव्हापासून त्याची आणि शिखर धवनची जोडी चांगली जमली आहे. विंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी विराटने मधल्या फळीत रोहितऐवजी हनुमा विहारीस संधी दिली आणि विहारीने संधीचा फायदा घेतला. या पार्श्‍वभूमीवर काही माजी कसोटीपटूंनी रोहितला सलामीला खेळवण्याची सूचना केली आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर निवड समितीची बैठक झालेली नाही. रोहितला सलामीला खेळवण्याबाबत आम्ही नक्कीच विचार करू. अर्थात केएल राहुल हा गुणवान खेळाडू आहे. कसोटीत सध्या त्याचा सूर हरपलेला आहे. त्याबाबत आम्हाला नक्कीच चिंता वाटत आहे. त्याने खेळपट्टीवर जास्त वेळ थांबण्याची गरज आहे. हे घडल्यासच त्याला सूर गवसेल, असे निवड समितीचे अध्यक्ष प्रसाद यांनी सांगितले.

चहल, कुलदीपचा ट्‌वेंटी-20 साठी नक्कीच विचार
विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने आर अश्‍विन आणि रवींद्र जडेजाऐवजी युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवला पसंती दिली होती. आता ट्‌वेंटी-20 लढतीसाठी वॉशिंग्टन सुंदरच्या साथीला राहुल चहरची निवड करताना चहल आणि कुलदीपला संघाबाहेर ठेवण्यात आले. "भारतीय फिरकी माऱ्यात वैविध्य आणण्यासाठी आम्ही नवोदितांना संधी देत आहोत. ऑस्ट्रेलियातील विश्‍वकरंडक ट्‌वेंटी-20 साठी नक्कीच चहल आणि कुलदीप शर्यतीत आघाडीवर आहेत, पण आम्ही विविध पर्याय बघत आहोत,' असे प्रसाद यांनी सांगितले.

निवड समिती अध्यक्ष म्हणतात...
- श्रेयस अय्यरने परिस्थितीनुसार खेळू शकतो हे दाखवून दिले
- नवदीप सैनी, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदरची मर्यादित षटकांच्या लढतीत चांगली प्रगती
- हनुमा विहारीची फलंदाजी ही विंडीजविरुद्धच्या मालिकेतील सर्वात जमेची बाब
- कसोटीतील यशासाठी अजिंक्‍य रहाणे संघासाठी मोलाचा
- प्रत्येक सामन्यागणिक विराटचे नेतृत्त्व कौशल्य उंचावणारे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Shama may open in test match also