INDvsSA : ODIच काय कसोटीही तितक्याच सहज खेळू शकतो हेच दाखवायचंय रोहितला!

Rohit Sharma
Rohit Sharma

विशाखपट्टणम : एकदिवसीय आणि टी 20 क्रिकेटमध्ये "हिट' ठरलेल्या रोहित शर्माला आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आपण कसोटी क्रिकेटसुद्धा तितक्‍याच सहज खेळू शकतो हे सिद्ध करावे लागणार आहे. भारताच्या सलामीचा प्रश्‍न सोडविण्याबरोबरच त्याला स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान जास्त पेलावे लागणार आहे. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बुधवारपासून (ता. 2) येथे सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनासमोरही निरनिराळी आव्हाने राहणार आहेत. यात पहिले आव्हान सलामीच्या फलंदाजांची डोकेदुखी दूर करणे, दुसरे मालिका जिंकून आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थान टिकविणे आणि तिसरे म्हणजे मायदेशात सलग 10 मालिका जिंकण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रम मोडित काढणे या आव्हानांचा समावेश असेल. 

या सगळ्या आव्हानांचा विचार करून भारत या सामन्यासाठी मैदानात उतरेल तेव्हा पहिल्या कसोटीत सगळे लक्ष 32 वर्षीय रोहितकडेच असेल. रोहित 2013 नंतर फारसे कसोटी क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे या वेळी सूर गमावलेल्या लोकेश राहुलच्या जागी संधी मिळाल्यावर तो या संधीचे सोने कसे करतो हाच औत्सुक्‍याचा भाग असेल. 

"रोहित खूप मेहनत घेत आहे. त्याला जर संधी मिळाली, तर तो निश्‍चितच चांगला खेळ करून दाखवेल,"हे उपकर्णधार अजिंक्‍य रहाणेचे शब्द त्याला खरे करून दाखवायचे आहेत. सराव सामन्यात त्याला दोनच चेंडू खेळता आले. त्यानंतर माजी कसोटीपटू लक्ष्मण याने त्याला नैसर्गिक खेळावर चिकटून राहण्याचा सल्ला दिला. आता या सगळ्या दडपणाचा रोहित कसा सामना करतो हेच पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचे सार ठरेल. 

दक्षिण आफ्रिकेची "कसोटी' 
दुसरीकडे हशिम आमला आणि डेल स्टेन निवृत्त झाल्यावर दक्षिण आफ्रिका प्रथमच एखादी मोठी द्विपक्षीय मालिका खेळत आहे. अशा वेळी त्यांच्यासमोर बलाढ्य भारताचे आव्हान राहणार यात शंका नाही. 

व्हर्नान फिलॅंडर, कागिसो रबाडा,. लुंगी एन्गिडी, डु प्लेसि आणि क्विंटॉन डी कॉक इतकेच हाताच्या बोटावर मोजता येतील असे अनुभवी खेळाडू दक्षिण आफ्रिका संघात आहेत. ऍन्‍रिच नॉर्टजे, यष्टिरक्षक फलंदाज रुडी सेकंड, डावखुरा फिरकी गोलंदाज सेनुरान मुथुस्वामी हे तीन खेळाडू प्रथमच कसोटी क्रिकेट खेळणार आहेत. भारताविरुद्ध वर्चस्व राखायचे असेल, तर पहिल्याच सामन्यात सुरवातीपासून त्यांयावर आक्रमण करावे लागेल असे त्यांचे नियोजन राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. पण, ते नियोजन मैदानत उतरविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com