World Cup 2019 : कोहलीच्या अग्रस्थानास रोहित शर्माचा हादरा

वृत्तसंस्था
Monday, 8 July 2019

एकाच विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके करण्याचा पराक्रम केलेला रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीतील विराट कोहलीच्या अव्वल स्थानास धक्का देत आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली अव्वल आहे, तर रोहित दुसरा.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : एकाच विश्वकरंडक स्पर्धेत पाच शतके करण्याचा पराक्रम केलेला रोहित शर्मा जगातील सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाजाच्या क्रमवारीतील विराट कोहलीच्या अव्वल स्थानास धक्का देत आहे. 
फलंदाजांच्या क्रमवारीत कोहली अव्वल आहे, तर रोहित दुसरा. कोहलीने या स्पर्धेत आतापर्यंत 63.14 च्या सरासरीने 442 धावा करीत एक मानांकन गुण मिळविला आहे. त्याचे आता 891 मानांकन गुण आहेत. रोहितने सरस कामगिरी करीत आता दोघांतील फरक सहा गुणांवर आणला आहे. स्पर्धेपूर्वी हाच फरक 51 गुणांचा होता. रोहितचे आता 885 गुण आहेत. 

पाकिस्तानचा बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण, ही त्याची सर्वोत्तम कामगिरी नाही. तो गतवर्षीच्या जूनमध्ये दुसरा होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अव्वल दहामध्ये आला आहे. विश्वकरंडकातील सर्वाधिक धावात वॉर्नर (638) आणि रोहित यांच्यात नऊ धावांचा फरक आहे. न्यूझीलंड कर्णधार केन विलियमसनने चार क्रमांकाने प्रगती करीत आठवे स्थान मिळविले. 

गोलंदाजीच्या क्रमवारीत जसप्रीत बुमराने अव्वल स्थान भक्कम करताना दुसऱ्या क्रमांकावरील ट्रेंट बोल्टवरील आघाडी 21 वरून 56 गुणांची केली आहे. बुमराने स्पर्धेत 17 फलंदाज बाद केले आहेत. पॅट कमिन्सने तीन क्रमांकाने प्रगती करीत तिसरे स्थान मिळविताना कागिसो रबाडा आणि इमरान ताहिरला मागे टाकले. मुजीब उर रहमान सहावा, तर रशीद खान आठवा आहे. 

इंग्लंडच अव्वल; पण... 
इंग्लंडने जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान राखले. त्यांचे 123 गुणच आहेत. दुसऱ्या क्रमांकावरील भारतास त्यांनी काही गुणांनी मागे टाकले आहे. तिसऱ्या क्रमांकावरील न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाचे समान 112 गुण आहेत, तर स्पर्धेत सर्वांत पहिले गारद झालेल्या दक्षिण आफ्रिकेचे 110. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Sharma reaches near Virat Kohli in ICC ODI ranking