माझी मेहनत सफल झाली - सौरभ भावे (व्हिडिओ)

Saurabh-Bhave
Saurabh-Bhave

पिंपरी - ‘शिवछत्रपती पुरस्कार मिळावा, अशी प्रत्येक खेळाडूची अपेक्षा असते. तशी माझीही होती. त्याच्या मागे, माझी खूप वर्षांची मेहनत होती. ती मेहनत सफल झाली,’’ अशी भावना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेता युवा रोलर स्केटिंगपटू सौरभ भावे याने व्यक्त केली. आगामी जागतिक आणि आशियायी अजिंक्‍यपद स्पर्धेत पदके मिळविण्याचे लक्ष्य असल्याचेही त्याने सांगितले.

राज्यातील क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठित आणि मानाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने चिंचवडगावातील रोलर स्केटिंगपटू सौरभ याला सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त ‘सकाळ’शी सौरभ बोलत होता.

सौरभ म्हणाला, ‘ज्ञानप्रबोधिनी-निगडी शाळेत असताना वयाच्या आठव्या वर्षापासून रोलर स्केटिंगला सुरवात केली. त्या वेळी शाळेत उन्हाळी शिबिरात खेळाचे प्रशिक्षण दिले जात होते. तेथे रोलर स्केटिंग विषयी आवड निर्माण झाली. २००५ मध्ये पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणीत सर्वप्रथम खेळण्याची संधी मिळाली. 

त्यानंतर पुढील ५-६ वर्षे राज्य संघात व नंतर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय (खुल्या) पातळीवर खेळू लागलो. जुलैमध्ये स्पेन येथे जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा होणार आहे. त्यात पात्र होणे माझे पहिले उद्दिष्ट राहील. त्यानंतर २०२० मध्ये आशियायी आणि जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा होणार आहे. त्यातही पदके मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. जागतिक आणि आशियायी रॅकिंगमध्येही सुधारणा करण्यावर भर राहील.’’

वाकड येथील इंदिरा महाविद्यालयामधून सौरभने बी.कॉम. पदवी मिळविली आहे. सौरभने आतापर्यंत २७ व्या राज्य रोलर स्केटिंगमध्ये प्रथम, ५२ व्या राष्ट्रीय रोलर स्पोर्टसच्या (स्पीड स्केटिंग-इनलाइन) वरिष्ठ गटात आणि ५३ व्या राष्ट्रीय रोलर स्पोर्टस (स्पीड स्केटिंग) वरिष्ठ गटात रौप्यपदके पटकाविली आहेत. 

चीन येथील जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेतही त्याचा सहभाग राहिला आहे. कासारसाई येथील स्केटिंग रिंकवर सौरभ प्रशिक्षक राहुल राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

कासारसाई येथील स्केटिंग रिंकमुळे खेळाडू आणि पालकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. मुलांनी अभ्यासात प्रगती करावी, अशी पालकांची अपेक्षा असते. परंतु सौरभने खेळातही प्रगती केली आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. भविष्यात त्याने अशीच प्रगती करावी.
- स्वाती आणि सुशील भावे, आई-वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com