World Cup 2019 : 'वर्ल्ड कप' जिंकायला हाच संघ हवा होता; कारण..

मंगळवार, 16 एप्रिल 2019

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे दिसत आहे.

वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे दिसत आहे. अनुभव आणि युवा अशी जोड असलेला हा भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत नक्कीच उजवा आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी आज 15 जणांच्या संघाची निवड केली. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी या 2011 मध्ये विश्वकरंडक जिंकलेल्या संघातील खेळाडूंव्यतिरिक्त इतर नवखेच आहेत. 2015 च्या विश्वकरंडकात यातील काही खेळाडूंना दडपणाचा अनुभव आहे. या विश्वकरंडकासाठी निवडलेल्या संघाची ताकद पाहिली तर तगडे सलामीवीर, भक्कम मधली फळी आणि तीन अष्टपैलू अशी आहे. याचा फायदा भारताला इंग्लंडमधील वेगवान खेळपट्ट्यांवर फायदा होण्याची शक्यता आहे. कारण, भारताकडे या परिस्थितीत खेळणारे खेळाडू असल्याने हाच संघ तिसऱ्यांदा भारताला विश्वकरंडक मिळवून देण्याची संधी आहे. भारताने गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेत भारताला सपाटून मार खावा लागला होता. पण, कसोटी आणि वनडे क्रिकेट वेगळे असल्याने भारताला ही कामगिरी विसरून नव्याने मैदानात उतरणेच योग्य राहिल.

आक्रमतकेला जोड कॅप्टन कूलची
या भारतीय संघात सर्वांत जास्त अनुभव आहे, तो यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीकडे. तर, दुसरीकडे जगात सर्वांत आक्रमक खेळाडू म्हणून ओळख आहे कर्णधार विराट कोहलीची. विराटने आतापर्यंत आपल्या नेतृत्व गुणांच्या जोरांवर अनेक मालिकांमध्ये विजय मिळविलेला आहे. तसेच त्याने भारतीय संघाला क्रमवारीत कायम अव्वल ठेवले आहे. विश्वकरंडक जिंकणारा कर्णधार असे बिरूद मिरविण्यासाठी त्याला धोनीची साथ मिळणे आवश्यक आहे. डीआरएस, अखेरच्या क्षणी थंड डोक्याने निर्णय घेणे, क्षेत्ररक्षणातील बदल, संघाच्या पडझडीत धावून येणे अशा काही धोनीच्या कला आहेत. यात त्याला हात कोणीच धरू शकत नाही. त्याला विचारल्याशिवाय गोलंदाजच काय कर्णधारपण डीआरएस घेत नाही. इंग्लंडमध्येच झालेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचा इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना अजूनही क्रिकेटप्रेमींच्या स्मरणात आहे. त्याने ईशांत शर्मावर विश्वास ठेवून दिलेली गोलंदाजी आणि भारताने जिंकलेला करंडक. विराट अद्याप एवढा परिपक्व नाही, असे बोलले जात असताना धोनीचा हा अनुभव नक्कीच भारतीय संघाच्या कामी येणार आहे. विश्वकरंडकासारख्या स्पर्धेत आक्रमकतेला कॅप्टन कूलची जोड मिळणार असल्याने भारताची संधी अजून वाढते.

गोलंदाजीबाबत प्रश्नच नाही
जगात सर्वोत्तम गोलंदाजीची फळी असे सध्या भारतीय संघाकडे पाहिले जाते. जलदगती म्हणा की फिरकीपटू यांची कामगिरी जगभरातील कोणत्याही खेळपट्टीवर सरस होताना दिसत आहे. गेल्यावर्षी भारताने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी मालिका खेळल्या. या मालिकेतील भारतीय गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय होती. तर, एकदिवसीय मालिकांसाठी कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल ही फिरकी जोडी कायमच कमाल दाखवत आलेली आहे. जसप्रीत बुमरा हा जगातील अव्वल गोलंदाज भारताकडे आहे. तर, वेगाचा बादशहा महंमद शमी आणि स्विंग मास्टर भुवनेश्वर कुमारसारखे आपल्या ताफ्यात आहेत. या पाच गोलंदाजांमुळे गोलंदाजीत नवा बदल केला जाईल, हा प्रश्नच निवड समितीपुढे नव्हता. गोलंदाजांनीही आपल्या कामगिरीतून संघातील स्थान आपले निश्चित केलेले आहे. इंग्लंडमधील वेगवान खेळपट्टीवर आपले तिन्ही गोलंदाज प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांची भंबेरी उडविल्याशिवाय राहणार नाहीत, यात कोणालाच शंका नाही. त्यांच्या जोडीला हार्दिक पंड्या, विजय शंकर या मध्यमगती गोलंदाजांचीही जोड असणार आहे. 

अष्टपैलूंचा भरणा
विश्वकरंडक जिंकायचा असेल तर संघात अष्टपैलू खेळाडू हवेतच, हे आतापर्यंत आपण पाहिलेच आहे. 2011 च्या विश्वकरंडकातही अष्टपैलू कामगिरी करणारा युवराजसिंग भारतासाठी किंगमेकर ठरला होता. आताच्या संघातही बघितले तर हार्दिक पंड्या, विजय शंकर, रवींद्र जडेजा, केदार जाधव या अष्टपैलू खेळाडूंना स्थान मिळाले आहे. हार्दिक पंड्या हा असा खेळाडू आहे, की ज्याच्याच कोणत्याही क्षणी सामन्याचे चित्र पालटविण्याची क्षमता आहे. तर, अवघ्या काही महिन्यांत विश्वकरंडकाचे तिकीट मिळविणारा विजय शंकर हा भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आपल्या वेगळ्या शैलीने अडचणीच्या काळात बळी मिळवून देणारा केदार जाधव मधल्या फळीत असणार आहे. तर, फिरकी गोलंदाजी, मोठे फटके आणि क्षेत्ररक्षणात चपळता असलेला रवींद्र जडेजाही संघात आहे. त्यामुळे अष्टपैलूंचा भरणा ही सुद्धा आपली ताकद असल्याने येथेही भारताचाच दावा आणखी मजबूत होतो.

असो, आता अवघ्या काही दिवसांवर आलेली विश्वकरंडक स्पर्धेत यजमान इंग्लंड, गतविजेता ऑस्ट्रेलिया यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे. पण, भारतीय संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या संघात सर्वकाही असल्याने विराट विश्वकरंडक उंचावताना कोट्यवधी भारतीयांना पाहायला आवडेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sachin-nikam-writes-about-world-cup-squad-selection