सचिन तेंडुलकरचा आयसीसीकडून गौरव; हॉल ऑफ फेममध्ये समावेश

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

- हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर हा भारताचा सहावा खेळाडू
- या आधी बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड​ यांचा समावेश
- सचिनसह दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाचे कॅथरिन फिट्सपॅट्रीक यांचाही यांचाही समावेश
 

लंडन : भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. 

सचिनसह दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू अॅलन डोनाल्ड आणि ऑस्ट्रेलियाचे कॅथरिन फिट्सपॅट्रीक यांचाही हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी (ता.18) लंडनमध्ये झालेल्या समारंभात यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. 

''माझ्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानतो. माझे आई वडिल, भाऊ अजित आणि पत्नी अंजली यांचा मला मोठा पाठिंबा राहिलेला आहे. तसेच माझे गुरु रमाकांत आचरेकर यांच्यासारखे गुरु मला लाभले हे माझे भाग्य आहे,'' अशा शब्दांत त्याने आपल्या भावना मांडल्या. 

आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश झालेला सचिन तेंडुलकर हा भारताचा सहावा खेळाडू आहे. यापूर्वी बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनिल गावसकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांचा आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश केला गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sachin Tendulkar inducted into ICC Hall of Fame