Ashes 2019 : ऑस्ट्रेलियाच्या बचावामुळे दुसरी कसोटी अनिर्णित

वृत्तसंस्था
Monday, 19 August 2019

इंग्लंडने विजयासाठी 48 षटकांत 267 धावांचे आव्हान ठेवल्यावर ऑस्ट्रेलियाची प्रथम जोफ्रा आर्चरसमोर 2 बाद 19 अशी अवस्था झाली होती.

ऍशेस 2019 : लंडन : क्रिकेटच्या नव्या नियमानुसार जखमी स्टीव स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून संधी मिळालेल्या मार्कस लाबुशेन आणि ट्राविस हेडच्या संयमी खेळीने ऑस्ट्रेलियाला 'ऍशेस' मालिकेतील दुसरी कसोटी अनिर्णित राखता आली. विजयासाठी 267 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 6 बाद 154 धावा केल्या. 

इंग्लंडने विजयासाठी 48 षटकांत 267 धावांचे आव्हान ठेवल्यावर ऑस्ट्रेलियाची प्रथम जोफ्रा आर्चरसमोर 2 बाद 19 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर फिरकी गोलंदाज जॅख लीचने बॅंक्रॉफ्टचा अडथळा दूर केला. स्मिथ जखमी झाल्यामुळे चालू सामन्यात बदली खेळाडू घेण्याच्या नव्या नियमाचा आधार घेत ऑस्ट्रेलियाने लाबुशेनला संधी दिली. लाबुशेनने संयमी फलंदाजी करताना ट्राविस हेडच्या साथीत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. चौथ्या विकेटसाठी या जोडीने 85 धावांची भागीदारी केली. मात्र, याच दरम्यान लीचने अर्धशतक करणाऱ्या लाबुशेनचा अडसर दूर केला. लगोलग मॅथ्यू वेडलाही बाद केले. षटके संपत असली, तरी ऑस्ट्रेलियावरील दडपण काही संपले नव्हते. आर्चरने कर्णधार पेनला बाद करून ते आणखी वाढवले. त्यानंतर सात षटकांत ट्राविस हेड आणि पॅट कमिन्स यांनी विकेट राखत केवळ पाच धावा करून सामना अनिर्णित राखला. 

त्यापूर्वी, इंग्लंडला अष्टपैलू बेन स्टोक्‍सच्या नाबाद शतकी खेळीने ऑस्ट्रेलियासमोर तगडे आव्हान ठेवता आले. चौथ्या दिवस अखेरच्या 4 बाद 96 धावसंख्येवरून पुढे खेळताना स्टोक्‍सने जोस बटलरच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारीकरून इंग्लंडचा डाव सावरला. कमिन्सने ही जोडी फोडताना बटलरला बाद केले. त्यानंतर जॉनी बेअरस्टॉने स्टोक्‍सला मोलाची साथ दिली. स्टोक्‍सने आपले शतक पूर्ण केले. स्टोक्‍सने बेअरस्टॉच्या साथीत आणखी एक 97 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. तेव्हा कर्णधार ज्यो रुटने 5 बाद 258 धावसंख्येवर इंग्लंडचा दुसरा डाव घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर 48 षटकांत 267 धावांचे आव्हान ठेवले. 

संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड 258 आणि 5 बाद 258 घोषित (बेन स्टोक्‍स नाबाद 115 -165 चेंडू, 11 चौकार, 3 षटकार, जोस बटलर 31, जॉनी बेअरस्टॉ नाबाद 30, पॅट कमिन्स 3-35, पीटर सडिल 2-54) ऑस्ट्रेलिया 250 आणि 6 बाद 154 (मार्कस लाबुशेन 59, ट्रविस हेड 42, आर्चर 3-32, लीच 3-37)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second Test drawn in Ashes series at Lords