Shardul Thakur : मुंबई विमानतळावर शार्दुल ठाकूरने मागितली मदत, हरभजन आला धावून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shardul Thakur Asked Help In Mumbai Airport

Shardul Thakur : मुंबई विमानतळावर शार्दुल ठाकूरने मागितली मदत, हरभजन आला धावून

Shardul Thakur Asked Help In Mumbai Airport : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरी वनडे मालिका दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर झाली. सामना संपल्यानंतर भारतीय संघातील वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर होम टाऊन मुंबईत परतला. मात्र मुंबई विमानतळावर त्याला अडचणींचा सामना करावा लागला. ही अडचण सोडवण्यासाठी शार्दुल ठाकूरने ट्विट करून एअर इंडियाकडे मदत मागितली. एअर इंडियाकडून त्याला उत्तर मिळाले की नाही हे माहिती नाही. मात्र एअर इंडियाचा माजी कर्मचारी हरभजन सिंगने मात्र शार्दुलच्या ट्विटवर लगेचच प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Video : अँग्री रायडू भडकला! जॅक्सनच्या अंगावर गेला धावून, क्रुणाल पांड्या होता म्हणून...

शार्दुल ठाकूरने मुंबई विमानतळावरील टर्मिनल 2 वरून एअर इंडियाला टॅग करत ट्विट केले की, 'एअर इंडिया तुम्ही लगेज बेल्टजवळ माझ्या मदतीसाठी कोणालातरी पाठवाल का? माझी किटबॅग अजून आलेली नाही आणि इथं कोणीही कर्मचारी उपस्थित नाही. हे काही पहिल्यांदाच झालेले नाही.'

यावर माजी एअर इंडियाचा कर्मचारी हरभजन सिंगने त्वरित प्रतिक्रिया दिली. हरभजनने ट्विट केले की, 'प्रीय शार्दुल आम्ही तुला तुझी बॅग मिळेल याची काळजी घेतो आणि आमचे कर्मचारी तुला मदत करायला तेथे पोहचतील. तुला झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी. माजी एअर इंडिया कर्मचारी भज्जी.' यावर शार्दुल ठाकूरने देखील प्रतिक्रिया दिली की, 'भज्जी पा लव्ह यू टू मला स्पाईस जेटच्या कर्मचाऱ्यांकडून मदत मिळाली.'

हेही वाचा: Nasser Hussain : टीम इंडिया घाबरट! नासिर हुसैन यांचे वर्ल्डकपपूर्वीच वादग्रस्त विधान

शार्दुल ठाकूर नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेतील तीनही सामन्यात अंतिम 11 मध्ये खेळला होता. त्याने पहिल्या सामन्यात 35 धावात 2 विकेट्स घेतल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात 36 धावा देत 1 बळी मिळवला. तिसऱ्या सामन्यात त्याला विकेट घेता आली नाही. पहिल्या सामन्यात शार्दुलने 33 धावांची उपयुक्त खेळी देखील केली होती. शार्दुल ठाकूर आता भारतीय टी 20 वर्ल्डकप संघात सामील होण्यासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. त्याची 15 च्या संघात निवड झालेली नाही. मात्र तो स्टँड बाय खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.