esakal | धवनने टोचून घेतली लस; फोटो शेअर करत देशवासियांना केलं आवाहन
sakal

बोलून बातमी शोधा

shikhar dhawan

धवनने टोचून घेतली लस; फोटो शेअर करत देशवासियांना केलं आवाहन

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोरोनामुळे अखेर इंडियन प्रिमियर लीग स्पर्धा (IPL 2021) अर्ध्यावर स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली. प्लेयर्स आता आपापल्या घरी परतत आहेत. दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) ही दिल्लीस्थित आपल्या घरी परतला आहे. स्पर्धेतून माघारी परतताच धवनने कोरोना लस घेण्याला प्राधान्य दिले. त्याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरचा फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून शेअर केलाय.

फोटोसह शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, व्हॅक्सिन डन! कोरोनाच्या संकटजन्य परिस्थितीत फ्रंटलाइनवर काम करताना जीव गमावणाऱ्यांचे बलिदान अविस्मरणीय आहे. सध्याच्या संकटाच्या काळात सर्वांनी नियमाचे पालन करणे गरजेचे असून कोणतीही शंका न बाळगता प्रत्येकाने लवकरात लवकर लस घ्यायला हवी. कोरोनावर मात करण्यासाठी ही काळाची गरज आहे, असा संदेशही शिखर धवनने देशवासियांना दिला आहे.

हेही वाचा: IPL 2021: स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंना फुल्ल सॅलरी मिळणार?

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी सर्वात पहिल्यांदा कोरोनाची लस घेतली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंमध्ये लस घेणारा शिखर धवन हा पहिला खेळाडू आहे. बायो-बबलमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील (KKR) वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद संघातील वृद्धीमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील अमित मिश्रा यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. खेळाडूंचे एकामागून एक पॉझिटिव्ह रिपोर्ट येत असल्यामुळे बीसीसीआयला स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.