esakal | IND vs AUS: स्मृती मानधनाचं धडाकेबाज शतक! ऑस्ट्रेलियात रचला इतिहास | Smriti Mandhana
sakal

बोलून बातमी शोधा

Smriti-Mandhana-100

स्मृतीने २२ चौकारांसह केली १२७ धावांची दमदार खेळी

स्मृती मानधनाचं धडाकेबाज शतक! ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

sakal_logo
By
विराज भागवत

IND vs AUS Pink Ball Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघांमध्ये ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान दिवस रात्र पद्धतीचा गुलाबी चेंडूचा कसोटी सामना सुरू आहे. भारतीय महिला संघाचा हा पहिलाच दिवस रात्र पद्धतीचा कसोटी सामना आहे. या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या दिवसाच्या खेळावर वर्चस्व राखले. त्यासह दुसऱ्या दिवशी भारताच्या स्मृती मानधनाने इतिहास रचला. मराठमोळ्या स्मृती मानधनाने दमदार शतक झळकावत एक भव्य दिव्य पराक्रम केला.

ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंग हिने नाणेफेक जिंकत प्रथम भारतीय संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघी मैदानात आल्या. दोघींनी २५ षटके फलंदाजी करून ९३ धावांची अप्रतिम सलामी दिली. पण शफाली अर्धशतक करू शकली नाही. ६४ चेंडूत ४ चौकारांसह तिने ३१ धावा केल्या. स्मृती मानधनाने मात्र आपली दमदार फलंदाजी सुरूच ठेवली. स्मृतीने दिमाखदार अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या खेळात तिने शतक झळकावले. गुलाबी चेंडूने दिवस रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारी स्मृती ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. ऑस्ट्रेलियन धर्तीवर शतक ठोकणारीदेखील ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली.

स्मृतीने आपल्या दमदार खेळीने साऱ्यांचीच मनं जिंकली. स्मृतीला ८० धावांवर असताना एकदा जीवदान मिळाले होते. नो बॉलवर ती झेलबाद झाली होती. पण त्या जीवदानाचा फायदा घेत तिने अप्रतिम शतक लगावले. तिने आपल्या खेळीत २२ चौकार आणि १ षटकार खेचला. १२७ धावा काढल्यानंतर मात्र स्मृतीचा डाव संपुष्टात आला.

loading image
go to top