ऑस्ट्रेलियाचं हे जरा अतिच होतंय : गांगुली

वृत्तसंस्था
शनिवार, 7 डिसेंबर 2019

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मी अजून अधिकृतपणे असे काही ऐकलेले नाही. चार सामन्यांच्या मालिकेत दोन सामने प्रकाशझोतात खेळणे म्हणजे अतिच होत आहे. पारंपरिक क्रिकेटला छेद देणे योग्य नाही. पण प्रत्येक कसोटी मालिकेत एक सामना प्रकाशझोतात खेळणे व्यवहार्य आहे

मेलबर्न : टीम इंडियाने पहिला वहिला प्रकाशझोतात कसोटी सामना खेळल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाची भूक वाढू लागली आहे. 2021 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, तेव्हा एक नव्हे तर दोन कसोटी प्रकाशझोतात खेळा; अशी मागणी ते करू लागले आहेत. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही "फारच मोठी मागणी' आहे, असे सांगत हा प्रस्ताव जवळपास नाकारला आहे. 

मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ जानेवारीत भारतात येत आहे त्यावेळी संघाबरोबर ईराल एडिंग्ज यांच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे एक प्रतिनिधी मंडळही भारतात येणार आहे. 
भारतीय संघ नुकताच प्रथमच प्रकाशझोतातला सामना खेळला आणि तो त्यांनी सहजच जिंकला, त्यामुळे प्रकाशझोतातील सामन्यासाठी त्यांची चांगली तयारी झाली आहे. 2021 मध्ये ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येतील तेव्हा त्यांनी एकापेक्षा अधिक प्रकाशझोतातील कसोटी सामने खेळावे, अशी मागणी आम्ही पुढील महिन्यात भारतात गेल्यावर करणार आहोत, असे मत एडिंग्ज यांनी मांडले आहे. परंतु, गांगुलीला ही कल्पना आवडलेली नाही. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मी अजून अधिकृतपणे असे काही ऐकलेले नाही. चार सामन्यांच्या मालिकेत दोन सामने प्रकाशझोतात खेळणे म्हणजे अतिच होत आहे. पारंपरिक क्रिकेटला छेद देणे योग्य नाही. पण प्रत्येक कसोटी मालिकेत एक सामना प्रकाशझोतात खेळणे व्यवहार्य आहे, असे गांगुली यांनी स्पष्ट केले. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्टस्‌ यांनीही काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया आकाशवाणीशी बोलताना चारपैकी दोन सामने प्रकाशझोतात खेळण्याबाबच विचार मांडले होते. भारताबरोबर आम्हाला पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायला आवडेल आणि ते शक्‍य झाल्यास एकपेक्षा दोन सामने प्रकाशझोतात होऊ शकतील असे रॉबर्टस्‌ म्हणाले होते. 

भारत आणि बांगलादेशचा अपवाद वगळता सर्व देश प्रकाशझोतात कसोटी खेळले होते, भारताचाही एवढ्यात विचार नव्हता, परंतु बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गांगुली यांनी तातडीने हालचाली करत बांगलादेशविरुद्ध इडन गार्डनवरील सामना प्रकाशझोतात खेळण्यासाठी सर्व ताकद पणास लावली. अशा प्रकारे भारतही प्रकाशझोतातील कसोटीच्या नकाशावर आला. 

भारताबरोबर घट्ट नाते 
भारताने प्रकाशझोतात कसोटी सामना खेळणे ही फार मोठी घटना आहे. क्रिकेटची ते किती काळजी घेतात हे त्यातून स्पष्ट झाले. आम्ही काही पत्रव्यवहारही केलेला आहे. जानेवारीमध्ये मंडळाच्या सदस्यांबरोबर मी भारतात जाणार आहे, त्यावेळी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी बैठक करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे एडिंग्ज यांनी सांगितले. भारताबरोबर आमचे चांगले नाते आहे. एकमेकांच्या विचाराचा आम्ही आदर करत आहोत. परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे काही मतभेद असू शकतात, पण आमचे नाते मजबूत आहे असे एडिंग्ज म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sourav Ganguly to deny australia decision to play day night matches with India