INDvsSA : पोरं कसोटी खेळतात की वनडे? आफ्रिकेला 384 धावांची गरज

वृत्तसंस्था
Saturday, 5 October 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावाला सुरवात झाली तीच मुळी आक्रमक खेळायचं असचं ठरवून. रोहित शर्मापासून ते अजिंक्य रहाणेपर्यंत सर्वांनीच फटकेबाजी केली. त्यामुळे भारताकडे सध्या 384 धावांची आघाडी आहे. 

विशाखापट्टणम : पहिल्या कसोटीत विजय मिळवण्याकरता भारतीय संघाची धडपड सामन्याच्या चौथ्या दिवशी चालू राहिली. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 431 धावांपर्यंत ताणला गेला. भारताच्या हाती 71 धावांची आघाडी लागली. पहिल्या डावात धडाकेबाज शतक करणार्‍या रोहित शर्माने दुसर्‍या डावातही शतक ठोकून कमाल केली. चेतेश्वर पुजारा (81 धावा) सह रोहित शर्माने केलेल्या मोठ्या भागीदारीने भारताला दुसर्‍या डावात 4 बाद 323 असा टप्पा गाठता आला. एकूण आघाडी 394 धावांची हाती आली असताना डाव घोषित केला गेला. चौथ्या दिवशी खेळ संपताना दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या डावात 1 बाद 11 अशी सावध मजल मारली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी पाहुण्या संघाचा दुसरा डाव वेळेत संपवून विजय संपादायचे विचार विराट कोहलीच्या डोक्यात पिंगा घालू लागले आहेत.

अफगाण स्टार महंमद नबीचा मृत्यू; ट्विटरवर खुलासा

चौथ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यावर उरलेल्या दोन फलंदाजांना बाद करायला अश्विनला कष्ट करावे लागले. केशव महाराजला बाद केल्यावर परत एकदा कोहलीने अश्विनला लगेच गोलंदाजीपासून रोखले जे अनाकलनीय होते. पाच सहा षटकांनंतर अश्विनला चेंडू हाती मिळाल्यावर त्याने रबाडाला पायचित करून दक्षिण आफ्रिकेचा डाव 431 धावांवर संपवला. अश्विनने 46 षटकांचा अथक मारा करत सात फलंदाजांना तंबूत धाडले.  

दुसर्‍या डावाची सुरुवात अपेक्षित झाली नाही. पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणारा मयांक आगरवाल लवकर बाद झाला. तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चेतेश्वर पुजाराने जम बसवायला भरपूर वेळ घेतला. झकास फलंदाजी करत अर्धशतकाच्या जवळ रोहित शर्मा जात असताना चेतेश्वर पुजारा 63 चेंडूत 8 धावांवर खेळत होता. नंतर अचानक पुजाराने लय बदलली. तो अचानक मस्त फटकेबाजी करू लागला. 9चौकारांसह एक षटकार मारून चेतेश्वर पुजाराने अर्धशतक पूर्ण केले. चहापानाला रोहित शर्मा 84 तर पुजारा 75 धावांवर नाबाद परतले.

चहापानानंतर चेतेश्वर पुजारा पायचित झाला तरी रोहित शर्माच्या डोक्यात दोनही डावात शतक ठोकायचा विचार पक्का होता. 9 चौकार आणि 4 षटकारांसह रोहितने दुसर्‍या डावातील शतक पूर्ण केले आणि अत्यंत शांतपणे बॅट वर केली. शतकानंतर पीडट्ला लागोपाठ तीन षटकार रोहितने मारले. खेळपट्टी अजूनही फलंदाजीला चांगली असल्याचा संदेश जणू काही रोहित देत होता.

INDvsSA : शर्माजी का बेटा छा गया! सर ब्रॅडमनांनाही टाकले मागे

7 षटकारांसह 127 धावांची खेळी सादर करून रोहित शर्मा केशव महाराजला बाद झाला. अचानक चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रवींद्र जडेजाने 40 धावा करून वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. धावसंख्या 4 बाद 323 झाल्यावर आणि एकूण आघाडी 394 ची जमा झाल्यावर विराट कोहलीने डाव घोषित करायचा निर्णय घेतला. चौथ्या दिवशीच्या खेळातील 15 षटकांचा खेळ बाकी होता.

खराब प्रकाशामुळे कोहलीला नवा चेंडू फिरकी गोलंदाजांच्या हाती द्यावा लागला. रवींद्र जडेजाने मोठी शिकार करताना सर्वात चिवट फलंदाज डीन एल्गरला अवघ्या 2 धावांवर पायचित केले. एडन मार्करम आणि डीब्रुईनने अजून पडझड होऊन दिली नाही आणि खेळ 1 बाद 11धावसंख्येवर कमी प्रकाशामुळे थांबवला गेला.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: South Africa needs more 384 runs to win against India in 1st test