Marathon : आळसाला जोरदार ‘किक’, धावण्याची ‘दम’दार ‘हाय’!

हितेंद्र चौधरी यांच्या मार्दर्शनाखाली जवळपास ४० जणांचा गट निष्ठेने सराव करीत आहे.
sport running pune marathon Sudha Singh Balewadi High Street 27 November
sport running pune marathon Sudha Singh Balewadi High Street 27 Novembersakal

पुणे : कोणत्याही खेळात होमग्राउंडचा फायदा स्पर्धकांना मिळत असतो. मॅरेथॉनच्या बाबतीत हाफ असल्यास २१ किलोमीटर, तर फुल असल्यास ४२ किलोमीटर १९५ मीटर इतक्या अंतराचा मार्ग असतो. याशिवाय सहभागी स्पर्धकांची संख्या हजारोंच्या घरात असते. अशावेळी होमग्राऊंडचा मुद्दा लागू होणे अवघड असते. बालेवाडी हायस्ट्रीटचा नेत्रदिपक परिसर मात्र यास अपवाद ठरला असून तेथे सराव करणाऱ्या धावपटूंसाठी २७ नोव्हेंबरची बजाजा अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉन ही होम इव्हेंटच असेल.

किक आणि हाय या संज्ञा बहुतांशवेळा नकारात्मक संदर्भात वापरल्या जातात, मात्र बालेवाडी हाय स्ट्रीटमध्ये याचे सकारात्मक उदाहरण सापडते. हितेंद्र चौधरी यांच्या मार्दर्शनाखाली जवळपास ४० जणांचा गट निष्ठेने सराव करीत आहे. येथील मंडळी आळसाला किक मारत धावून हायची अनुभुती मिळवितात. २७ नोव्हेंबर रोजी होम रुटवर शर्यत पूर्ण करून जल्लोषाचा त्यांचा निर्धार आहे.

यात सुमारे ३० दण हाफ मॅरेथॉन धावणार आहेत. साधारण दहा जण १० किमी शर्यतीत सहभागी होतील. चौधरी यांनी सांगितले की, म्हाळुंगे-बालेवाडी येथून जुपीटर हॉस्पीटल या मार्गावर बऱ्याच मॅरेथॉन होतात. या भागातील नागरीकही उत्साही आहेत. अनेक जण धावतात तसेच इतर असंख्य धावणाऱ्यांना प्रोत्साहन देत असतात. आम्ही मॅरेथॉनच्या मार्गावर सराव करतो. त्यामुळे आमच्या गटातील स्पर्धकांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे.

गेले दीड महिना सुरु असलेल्या प्रशिक्षणाला स्पर्धकांचा कसा प्रतिसाद आहे, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सहा वाजले म्हणून कुणाची वाट बघावी लागत नाही. याचे कारण ५ वाजून ४५ मिनिटांनीच मंडळी येऊन वॉर्म-अप सुरु करतात. कोरोना काळात मे महिन्याचा अपवाद सोडल्यास आमचा सराव क्वचित खंडित झाला.

चौधरी २०१२ पासून मॅरेथॉन धावत आहेत. ते ५३ वर्षांचे असून दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद अशा शहरांमधील प्रमुख स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले आहेत. पन्नाशी पार केली असली तरी १० किमी शर्यतीत ४३ मिनिटे, हाफ मॅरेथॉनला एक तास ३६ मिनिटे, तर फुल मॅरेथॉनला ३ तास ५१ मिनिटे अशा सर्वोत्तम वैयक्तिक वेळा त्यांनी नोंदविल्या आहेत.

या गटातील काही धावपटू उल्लेख करण्यासारखे आहेत. शैलजा कुमारी ३४ वर्षांच्या असून त्यांनी काही कॉर्पोरेट कंपन्यांमधील नोकरी केली. काही काळ त्या रेडीओ जॉकी सुद्धा होत्या. त्यानंतर त्यांनी वंचित-गरजू मुलांसाठी काही करण्याच्या उद्देशाने आकांक्षा फाऊंडेशनच्या टीच फॉर इंडिया स्कुलमध्ये नोकरी स्विकारली. त्या बोपोडीत सिनीयर केजीमध्ये शिकवितात. खेळासाठी नेहमीच उत्साही असल्याचे त्या नमूद करतात. १० किलोमीटर अंतर कमी वाटले तरी शर्यतीत धावणे अवघड असल्याने सरावात शिस्त लागते असे त्या नमूद करतात.

डिजीटील मार्केटिंग करणाऱ्या रोहित जोगळेकर याच्या वयाचा आकडा २६, तर वजनाचा आकडा ९१ किलो आहे. क्लब पातळीवर तो टेनिस खेळतो. २०१८ पासून तो दोन वेळा १० किमी, तर एकदा पाच किमी शर्यतीत सहभागी सुद्धा झाला आहे. कोरोनापूर्वी ८० किलोच्या घरातील वजन नंतर वाढले. याची कारणे म्हणून व्यायामाचा अभाव आणि खाण्यावर नियंत्रण नाही अशी कबुली तो देतो. गटाने सराव करायला लागल्यापासून त्याला प्रेरणा मिळाली. एक महिना गोड खाल्ले नाही असे सांगताना त्याचाच त्याच्यावर विश्वास बसत नसल्याचे जाणवते, मात्र आता मैदा टाळायचा आणि २७ नोव्हेंबरची शर्यत झाल्यानंतर सुद्धा कंट्रोल करायचा निर्धारही त्याने बाळगला आहे.अनुभूती चतुर्वेदी हिने दिल्ली हैदराबाद अशा स्पर्धांत गटात पदके मिळविली आहेत.

बीब हरवला, पण उत्साह नाही हरपला

आयटी तज्ज्ञ असलेल्या श्रीनिवास कळमकर यांनी २०१९ मधील स्पर्धेसाठी नावनोंदणी केली होती. आदल्यादिवशी एक्स्पोमध्ये जाऊन त्यांनी बीब आणि इतर साहित्य ताब्यात घेतले होते. नंतर एक्स्पोमध्ये फिरताना त्यांचा बीब हरवला. पर्यायी बीबची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची संधी हुकली. त्यावेळी त्यांनी एकट्याने सराव केला होता. कोरोना काळात त्यांनी सोसायटीत फिरणे, पोहणे, ट्रेडमील, योगा याद्वारे तंदुरुस्ती टिकवील. त्यामुळे त्यांचा उत्साह हरपला नाही. या वेळी नावनोंदणीनंतर त्यांनी हाय स्ट्रीटवरील गटात सहभाग घेतला. कळमकर ३९ वर्षांचे असून त्यांचे वजन आजपर्यंत ६० किलोच्यावर कधी गेलेले नाही. शाळेत तीन वर्षे एससीसी केल्याचा व तेव्हाचा धावण्याचा अनुभव फायदेशीर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

आज-उद्या एक्स्पो; सुधा सिंग आकर्षण

तिसऱ्या स्पर्धेच्या एक्स्पोचे म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॉक्सींग एरीनावर शुक्रवारी आणि शनिवारी (ता. २५-२६) आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी ११ ते ८ आणि शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशा एक्स्पोच्या वेळा आहेत. या कालावधीत स्पर्धकांना बीब घेता येतील. स्पर्धेची ब्रँड अॅम्बॅसेडर सुधा सिंग एक्स्पोचे आकर्षण असेल. शनिवारी तिच्याशी संवाद साधण्याची स्पर्धकांना संधी मिळेल. स्पर्धेच्या मुख्य तसेच सहप्रायोजक कंपन्या तसेच संस्थांचे स्टॉलही तेथे असतील. काही ठिकाणी आकर्षक योजनांची माहिती देण्यात येईल. स्पर्धक नसलेले सामान्य नागरिकही येथे येऊन वातावरण अनुभवू शकतात, अशी माहिती संयोजकांकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com