पॅराऑलिंपिक समिती केंद्राकडून बरखास्त

वृत्तसंस्था
Wednesday, 11 September 2019

पॅराऑलिंपिक जेमतेम एका वर्षावर असताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय पॅराऑलिंपिक समितीची संलग्नता रद्द केली आहे. समितीने अध्यक्ष राव इंदरजित सिंग यांची हकालपट्टी करताना राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

नवी दिल्ली : पॅराऑलिंपिक जेमतेम एका वर्षावर असताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय पॅराऑलिंपिक समितीची संलग्नता रद्द केली आहे. समितीने अध्यक्ष राव इंदरजित सिंग यांची हकालपट्टी करताना राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

पॅराऑलिंपिक समितीच्या कारभारात गैरव्यवहार असल्याचेही क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. राव इंदरजित यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. त्यांना पॅराऑलिंपिक समितीने बहुमताने ठराव करीत अध्यक्षपदावरून दूर केले. त्यांनी त्यापूर्वी सार्वजनिक सेवेतील व्यक्तींना वार्षिक सभेपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. राव इंदरजित सिंग हे केंद्र सरकारमधील योजना मंत्री आहेत.

आम्ही सर्वच निर्णयाबद्दल पॅराऑलिंपिक समितीला विचारणा केली होती. त्यांनी केलेल्या खुलाशाने समाधान झाले नाही, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर समितीची मे महिन्यात झालेली विशेष सर्वसाधारण सभा तसेच 25 जानेवारी आणि 25 फेब्रुवारीच्या वार्षिक सभा अवैध ठरवल्या आहेत. याच सभांतील ठरावामुळे राव इंदरजित सिंग यांना दूर करण्यात आले होते. समितीच्या घटनेत जिल्हा नोंदणी कार्यालयाची मंजुरी न घेता बदल करण्यात आल्याचाही क्रीडा मंत्रालयाचा दावा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports Ministry de-recognises Paralympic Committee of India