esakal | इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी
sakal

बोलून बातमी शोधा

सिडनी - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकाविल्यावर इंग्लंडच्या जोस बटलरने आपला आनंद असा व्यक्त केला.

इंग्लंडची मालिकेत विजयी आघाडी

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियावर १६ धावांनी मात
सिडनी - कसोटी मालिका जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत इंग्लंडविरुद्ध हार पत्करावी लागली आहे. इंग्लंडने तिसऱ्या सामन्यात रविवारी ऑस्ट्रेलियाचा १६ धावांनी पराभव करून पाच सामन्यांची मालिका खिशात घातली. 

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने जोस बटलरच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ६ बाद ३०२ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला ५० षटकांत ६ बाद २८६ असे रोखून विजय मिळविला.

जोस बटलरने मोक्‍याच्या वेळी झळकावलेले शतक आणि गोलंदाजांनी केलेल्या नियोजनबद्ध माऱ्यामुळे इंग्लंडला एकदिवसीय मालिका जिंकता आली. मार्क्‌स स्टोईनिसने अखेरच्या षटकापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या आशा पल्लवित ठेवल्या होत्या. मात्र, ‘डेथ ओव्हर’मध्ये मार्क वूड आणि ख्रिस वोक्‍स यांनी अचूक मारा करून ऑस्ट्रेलियाला विजयापासून दूर ठेवले. 

प्रथम फलंदाजी करताना एकवेळ ६ बाद १८९ असे अडचणीत असताना बटलर आणि वोक्‍स यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ११३ धावांची भागीदारी करून इंग्लंडचे आव्हान भक्कम केले. बटलरने अखेरच्या चेंडूवर कारकिर्दीमधील पाचवे शतक साजरे केले. त्यानंतर त्याने स्मिथचा घेतलेला झेलही इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा ठरला.

आव्हानाचा पाठलाग करताना पुन्हा एकदा ॲरॉन फिंच तुफान खेळला. पण, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून व्हाईट झटपट बाद झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या आव्हानावर मर्यादा आल्या. त्यानंतर कर्णधार स्मिथ, स्टाईनिस यांनी ऑस्ट्रेलियाला आशा दाखवल्या. पण, इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचेही काही चालले नाही. 

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ६ बाद ३०२ (जोस बटलर नाबाद १०० -८३ चेंडू, ६ चौकार, ४ षटकार, ख्रिस वोक्‍स नाबाद ५३, जोश हेझलवूड २-५८) वि.वि. ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ६ बाद २८६ (ॲरॉन फिंच ५२, मिशेल मार्श ५५, मार्क्‌स स्टोईनिस ५६, स्टिव्ह स्मिथ ४५, मार्क वूड २-४६, ख्रिस वोक्‍स २-५७)

loading image
go to top