esakal | ...तरीही भारतीय फुटबॉल जगाच्या १०० वर्षे मागे
sakal

बोलून बातमी शोधा

...तरीही भारतीय फुटबॉल जगाच्या १०० वर्षे मागे

...तरीही भारतीय फुटबॉल जगाच्या १०० वर्षे मागे

sakal_logo
By
पीटीआय

कोलकता - भारत जागतिक फुटबॉलमध्ये वर्चस्व राखत असलेल्या देशांच्या मागे शंभर वर्ष आहे. त्यांनी विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतून मिळालेल्या अनुभवाचा फायदा कसा होईल, याचा गांभीर्याने विचार करावा आणि भविष्यासाठी योजना तयार करावी, अशी सूचना इंग्लंडचे दिग्गज फुटबॉलपटू सोल कॅम्पबेल यांनी केली. त्याचवेळी त्यांनी भारतीयांनी फुटबॉल प्रगतीसाठी आपला विचार करूनच खेळाची शैली निश्‍चित करावी, त्यात बदल करू नये, असेही सांगितले. 

प्रीमियर लीगमध्ये २० वर्षे खेळण्याचा अनुभव असलेले इंग्लंडचे माजी बचावपटू कॅम्पबेल सध्या जागतिक फुटबॉल महासंघाच्या तांत्रिक समितीत आहेत. ते म्हणाले, जगातील काही फुटबॉल देश भारताच्या पुढे शंभर वर्षे आहेत. त्यांना गाठायचे असेल तर कुठेतरी सुरुवात करावी लागेल. आता या विश्वकरंडक स्पर्धेने चांगला अनुभव मिळाला आहे. भारतीयांनी आपल्या प्रगतीसाठी अधिकाधिक संघांविरुद्ध खेळायला हवे. 

जागतिक महासंघाबरोबर चर्चा करायला हवी; मात्र त्यासाठी आपला खेळाचा मूळ ढाचा न सोडणेच महत्त्वाचे ठरेल. स्पर्धा पात्रतेसाठी, लढती जिंकण्यासाठी काय करावे लागते हे समजून घ्यायला हवे. त्यासाठी कदाचित परदेशातून मदत लागेल. प्रतिस्पर्धी संघास कितपत आत येऊ द्यावे तसेच त्यांना कसे रोखावे हे शिकावे लागेल. त्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे योग्य होईल. केवळ पराभवातूनच नव्हे तर विजयातूनही शिकण्याची सवय करायला हवी, असे कॅम्पबेल यांनी सांगितले.

जागतिक क्रमवारीत भारताने काही वर्षात अव्वल शंभरमध्ये स्थान मिळवले आहे, याकडे लक्ष वेधल्यावर कॅम्पबेल म्हणाले, भारताने आपल्या फुटबॉल प्रगतीस वेग द्यायला हवा. त्यासाठी जगातील सर्वोत्तम संघांविरुद्ध सातत्याने खेळायला हवे. त्याचबरोबर हा खेळ नेमका कशाप्रकारे खेळला जातो, हेही बारकाईने समजून घ्यायला हवे. भारतात फुटबॉल प्रगती एका रात्रीत होणार नाही.

क्रिकेट हा येथील प्रमुख खेळ आहे, त्यात चटकन बदलही होणार नाही. त्यातही प्रगतीसाठी योग्य मार्गावरून वाटचाल करायला हवी. त्यासाठी प्रशिक्षण केंद्र, अकादमी हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

विजेतेपद जिंकल्याबद्दल इंग्लंड खेळाडूंचे अभिनंदन. आता त्यांची खरी परीक्षा असेल. त्यांनी व्यावसायिक फुटबॉल लीगसाठी स्वतःला तयार करायला हवे. त्यासाठी प्रथम श्रेणी स्पर्धात सातत्याने खेळायला हवे. हे काही प्रमाणात घडत आहे; पण त्यात सातत्य नाही. आता त्यांना चांगल्या मार्गदर्शकांची गरज आहे. 
- सोल कॅम्पबेल

loading image
go to top