esakal | आशियाई टीआरपीसाठी ‘एल क्‍लासिको’ दुपारी
sakal

बोलून बातमी शोधा

आशियाई टीआरपीसाठी ‘एल क्‍लासिको’ दुपारी

आशियाई टीआरपीसाठी ‘एल क्‍लासिको’ दुपारी

sakal_logo
By
वृत्तसंस्था

माद्रिद - लिओनेल मेस्सीचा एफसी बार्सिलोना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोचा रेयाल माद्रिद यांच्यातील ला लीगा अर्थात स्पॅनिश साखळीतील फुटबॉल लढतीची सर्वाधिक चर्चा होते. भारतीय उपखंडातील चाहत्यांसाठी यापूर्वी ही लढत मध्यरात्रीच होत असे; पण आता त्यांच्यासाठी ही लढत भरदुपारी खेळवण्याचे ठरवण्यात आले आहे.

एल क्‍लासिको संबोधले जात असलेल्या या रेयाल - बार्सिलोना लढतीस ६५ कोटी टीव्ही प्रेक्षक लाभतात. त्यातील बहुसंख्य आशियातील आहेत. आता त्यात वाढ करण्यासाठी यापूर्वी स्पॅनिश प्राईम टाइमला होणारी लढत आता आशियातील चाहत्यांसाठी त्यांना अनुकूल वेळेत होईल. ही लढत शनिवारी भारतीय वेळेनुसार आता साडेपाचला सुरू होणार आहे. 

आशियातील चाहत्यांचे औत्सुक्‍य लक्षात घेऊन आम्ही त्यांच्यासाठी लढतीची वेळ बदलली आहे, असे ला लीगाचे संपर्क आधिकारी जोरीस एव्हर्स यांनी सांगितले. स्पॅनिश फुटबॉल साखळीची किंमत वाढवण्यासाठीचा हा उपाय आहे, असे स्पेन फुटबॉलचे आर्थिक अभ्यासक जोस मारिया यांनी सांगितले. 

कॅटालोनिया आणि माद्रिद या स्पेनमधील दोन जिल्ह्यांतील पारंपरिक संघर्षाचे चित्र रेयाल-बार्सिलोना लढतीत दिसते. प्रतिस्पर्धी याच सामन्यातील यशासाठी आपली आर्थिक ताकद पणास लावतात. ला लीगासाठी ही लढत महत्त्वाची असते. गतवर्षी या लढतीने पुरस्कर्त्यांना सव्वाचार कोटी डॉलरची मीडिया व्हॅल्यू दिल्याचे सांगितले जात आहे. 

आशिया तसेच भारतातील प्रीमियर लीगच्या जास्त लोकप्रियतेस धक्का देण्यासाठी ला लीगाचे प्रयत्न आहेत. त्यामुळेच ला लीगातील काही लढती आशियात घेण्याबाबत विचार सुरू आहे. किमान मोसमापूर्वीच्या सराव लढतींसाठी प्रयत्न होत आहेत. प्रीमियर लीगनेही याच दिशेने विचार केला आहे. चॅंपियन्स लीग स्पेनमधील संघांनी गेल्या बारा वर्षांत सात वेळा जिंकली आहे; पण बार्सिलोनाच्या नेमारला फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मनने कितीतरी किंमत देऊन खरेदी केले. त्यातच इंग्लंडमधील पाच संघांनी चॅंपियन्स लीगची बाद फेरी गाठत स्पेनच्या वर्चस्वास हादरा दिला आहे. आर्थिक ताकद वाढवण्यासाठी ला लीगा आता जास्त ताकदीने आशिया मार्केटवर लक्ष केंद्रित करतील, असे मानले जात आहे. 

loading image
go to top