esakal | चेन्नईयिनची आज मुंबईशी लढत
sakal

बोलून बातमी शोधा

चेन्नईयिनची आज मुंबईशी लढत

चेन्नईयिनची आज मुंबईशी लढत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - चेन्नईयिन एफसीची इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) रविवारी मुंबई सिटी एफसीविरुद्ध लढत होत आहे. चेन्नईयिनचा सलग चौथा विक्रमी विजय मिळविण्याचा प्रयत्न राहील.

चेन्नईयिनला सलामीला घरच्या मैदानावर एफसी गोवाविरुद्ध पराभूत व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने जिंकले. गुणतक्‍त्यात त्यांनी आघाडीसुद्धा घेतली होती. नंतर बेंगळुरू एफसीने सरस गोलफरकामुळे त्यांना मागे टाकले.

फॉर्मातील प्रतिस्पर्ध्याला सामोरे जाण्यास सज्ज आहोत. मुंबई फुटबॉल एरिनावर आम्हाला चाहत्यांचे प्रोत्साहन मिळेल, असे मुंबईचा कर्णधार ल्युसियन गोऐन याने सांगितले. तो म्हणाला, की आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. सामन्यावर नियंत्रण ठेवणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे असेल. सामन्यागणिक कामगिरी उंचावत असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्हाला बराच आत्मविश्वास मिळाला आहे.

मुंबईचा संघ घरच्या मैदानावर परतला आहे. येथे मागील सामन्यात त्यांनी गोव्यावर विजय मिळविला. त्याआधी केरळा ब्लास्टर्सविरुद्ध त्यांनी बरोबरी साधली होती. ब्लास्टर्सविरुद्ध बाहेरील मैदानावर खेळावे लागले. त्यामुळे एक गुण महत्त्वाचा असल्याचे ल्युसियन म्हणाला. तो निकाल सकारात्मक होता, कारण आम्ही बाहेर खेळत होतो. कोचीमध्ये खेळणे प्रतिस्पर्ध्यांना सोपे नसते. अर्थात मला तेथील भारलेले वातावरण आवडते. तेथून आम्ही एक गुण घेऊन परतणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे घरच्या मैदानावरील सामन्यासाठी आत्मविश्वास उंचावला आहे, असे त्याने पुढे सांगितले. या लढतीत चेन्नईयिनचेच पारडे जड असेल. कारण त्यांनी सलग तीन विजय मिळविले आहेत. यात मागील सामन्यात घरच्या मैदानावर गतविजेत्या एटीकेवरील ३-२ अशा नाट्यमय विजयाचा समावेश आहे.

loading image
go to top