न्यूयॉर्क : कॅनडाच्या बियांका आंद्रेस्कू हिला दोन आठवड्यांपूर्वी कोणीही फारसे ओळखत नव्हते. गतवर्षी अमेरिकन टेनिस स्पर्धेस पात्रही न ठरलेली 19 वर्षीय बियांका विजेती होईल असे कोणास वाटले नव्हते, पण तिने सेरेना विल्यम्सला अगदी सहज हरवून अमेरिकन टेनिस स्पर्धेत विजेतेपद पटकावले.
टेनिसमधील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धांना बियांका चांगलीच नवीन आहे. तिला विजेतेपदाच्या करंडकाची कोणती बाजू समोर असावी हेही माहिती नव्हते. विजेतेपदाचा स्वीकार केल्यावर या कॅनडाच्या नव्या स्टारला स्पर्धा पदाधिकाऱ्यांनी करंडक कसा धरून उंचावला जातो, हे दाखवले. अर्थात गतवर्षी स्पर्धेस पात्र न ठरलेल्या, यापूर्वी कधीही ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत तिसरी फेरी न खेळलेल्या मुलीकडून काय अपेक्षा बाळगणार.
माझ्या क्षमतेवर माझा कमालीचा विश्वास आहे. त्यासाठी मी मेहनत घेत होते. सातत्याने कधीही प्रगती होत नाही. ही प्रगती होत असताना आपण सर्वोत्तम ठरू यासाठी लढत होते. स्वप्नपूर्तीची आशा बाळगून होते. त्याचवेळी क्षमतेचा कसा पुरेपूर उपयोग होईल याकडे लक्ष देत होते, असे वयास असाजेशी परिपक्वता दाखवत बियांकाने सांगितले. या वर्षाच्या सुरुवातीस जागतिक क्रमवारीत 178 वी असलेली बियांका स्पर्धेपूर्वी 15 वी होती.
बियांकाने 6-3, 7-5 बाजी मारत सेरेनाचे सर्वाधिक विजेतेपदाच्या बरोबरीचे स्वप्न लांबवले. सेरेनाच्या ताकदवान खेळास तोडीस तोड प्रत्युत्तर देणाऱ्या बियांकाने चुका कमी केल्या. अंतिम लढतीच्या दडपणासही ती चांगल्या प्रकारे सामोरी गेली. लहानपणी टेनिसचे धडे गिरवताना सेरेना ही बियांकाची आदर्श होती, पण तिच्याविरुद्ध अंतिम लढत खेळताना तिची आक्रमकता कमी झाली नाही. चाहते विरोधात असताना कम ऑन असे ओरडत ती स्वतःला प्रोत्साहित करीत होती. विजेतेपद आवाक्यात आल्याचे दडपण तिच्यावर आले आणि तिला 5-1 वरून 5-5 बरोबरी स्वीकारावी लागली, पण तिने विजेतेपद निसटू दिले नाही.
|