esakal | SL vs Ind 3 हिरो 3 झिरो; बॅटिंगमध्ये कुलदीप ठरला टॉपर
sakal

बोलून बातमी शोधा

IND vs Sl

SL vs Ind 3 हिरो 3 झिरो; बॅटिंगमध्ये कुलदीप ठरला टॉपर

sakal_logo
By
सुशांत जाधव

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाची अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळाले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत भारतीय संघाला निर्धारित 20 षटकात अवघ्या 81 धावात रोखले. यासाठी भारतीय संघाने 8 विकेट गमावल्या . कर्णधार शिखर धवन, संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्थी यांना खातेही उघडता आले नाहीत. भारतीय संघातील हे तीन हिरो झिरोवर बाद झाले. श्रीलंकेकडून हसरंगाने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय इतर गोलंदाजांनी एक एक विकेट घेत भारतीय संघाची अवस्था केविलवानी केली. (Sri Lanka vs India 3rd T20I You Know Lowest T20I totals Record for India and Lowest team totals batting out all 20 overs)

सलामीवीर ऋतूराज गायकवाडच्या 14, भुवनेश्वर कुमार 16 धावांशिवाय कुलदीप यादवने तळाला येऊन केलेल्या 23 धावांच्या नाबाद खेळीमुळे भारताची थोडीफार लाज राखली. या तिघांशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. भारतीय संघाची टी-20 मधील ही तिसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. जर कुलदीप थांबला नसता तर टी-20 च्या इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा नकोसा विक्रम भारतीय संघाच्या नावे झाला असता.

टी-20 च्या सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघाने निच्चांकी धावसंख्या केली होती. 2008 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मेलबर्न टी-20 सामन्यात भारतीय संघ अवघ्या 74 धावात आटोपला होता. 2016 मध्ये नागपूरच्या मैदानात न्यूझीलंडच्या संघाने भारताचा डाव 79 धावांत आटोपला होता. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध कटकमधील मैदानात भारतीय संघ शंभरीच्या आत ऑल आउट झाला होता. धावफलकावर अवघ्या 63 धावा असताना भारतीय संघाने आठवी विकेट गमावली. टी-20 तील निच्चांकी धावसंख्या भारताच्या नावे होण्याची परिस्थिती दिसत असताना कुलदीप मैदानात तग धरुन उभा राहिला. त्याने संघाकडून सर्वोच्च खेळी करत बॅटिंग करणं अवघड नव्हते याचीच झलक दाखवून दिली.

टी-20 क्रिकेटमधील निर्धारित 20 षटके खेळून निच्चांकी धावसंख्येचा लाजिवाणा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या नावे आहे. झिम्बाम्बे विरुद्धच्या सामन्यात 106 धावांचे टार्गेट चेस करताना वेस्ट इंडिजच्या संघाने 7 बाद 79 धावांपर्यंत मजल मारली होती. 2011 मध्ये पाकिस्तानने दिलेल्या 137 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ 9 बाद 85 धावांपर्यंतच पोहचला होता. 2014 मध्ये 96 धावा करुनही सामना जिंकताना वेस्ट इंडिजने आयर्लंडला 9 बाद 85 धावांत रोखले होते.

loading image
go to top