स्मिथ, वॉर्नरचे टी-20 संघात 'कमबॅक'

वृत्तसंस्था
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

मायदेशात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेवर लक्ष ठेऊन तयारी सुरु करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन केले आहे.

सिडनी : मायदेशात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेवर लक्ष ठेऊन तयारी सुरु करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन केले आहे. चेंडू कुरतडण्याचा गैरप्रकार केल्यामुळे हे दोघेही वर्षभर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होते. कसोटी आणि एकदिवसीय संघातून त्यांनी पुनरागमन केले होते. आता टी-20 संघातही त्यांची निवड करण्यात आली आहे.

स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे आम्ही स्वागत करत आहोत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हर हॉन्स यांनी सांगितले. स्मिथ हा सर्व प्रकारात जगद्विख्यात फलंदाज आहे. तर वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही तो सर्वार्धिक धावा करणारा फलंदाज ठरलेला आहे, असे हॉन्स म्हणाले.

आमच्या देशात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी अजून वर्षभराचा कालावधी आहे, परंतु आम्ही त्या दृष्टीने तयारी सुरु करणार आहोत. त्याचाच भाग म्हणून श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी ताकदवर संघ निवडला आहे, हाच संघ काही अपवाद वगळता विश्‍वकरंडक स्पर्धेपर्यंत कायम राहिल, असे संकेत हॉन्स यांनी दिले.

सर्व प्रकारच्या सामन्यात वर्चस्व राखूनही ऑस्ट्रेलियाला ट्‌वेन्टी-20 चा विश्‍वकरंडक अद्याप जिंकता आलेला नाही. या प्रकारात सध्या ते पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे मायदेशात होणाऱ्या स्पर्धेतून त्यांना मोठे यश मिळवायचे आहे.

श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळमार आहे. त्यानंतर त्यांची पाकिस्तानविरुद्धही मालिका होणार आहे.

ऑस्ट्रेलिया संघ : 
ऍरॉन फिन्च (कर्णधार), ऍस्टॉन अगर, अलेक्‍स कॅरी, पॅट कमिंस, ग्लेन मॅक्‍सवेल, बेन मॅकडरमॉट, केन रिचर्डस्‌न, स्टीव स्मिथ, बिली स्टॅनकेल, मिशेल स्टार्क, ऍश्‍टॉन टर्नर, अँड्रयु टेय, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झॅम्पा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve smith and David Warner come back in t 20 world cup