Ashes 2019 : ऐ आर्चर, जखमी केलंस पण मला आऊट नाही करु शकलास!

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

 या सामन्यात आर्चरचे चेंडू खेळण्यासाठी त्याच्या फलंदाजीत काही बदल करणार आहे का? असा प्रश्न विचारल्यावर त्याने स्पष्ट शब्दांत नाही असे उत्तर दिले. तो म्हणाला, ''नाही, मी कोणताही बदल करणार नाही. सगळे बोलत होते की आर्चर मला त्या सामन्यात वरचढ ठरला. मात्र, तो मला बाद करु शकला नाही.''

लंडन : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेस मालिकेत दुसऱ्या सामन्यात आर्चरचा तेजतर्रार बाउन्सर लागून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ जखमी झाला. त्याला तिसऱ्या सामन्याला मुकावे लागले. असे असले तरी ''दुसऱ्या सामन्यात तू मला जखमी केलेस पण मला आऊट नाही करु शकलास," असे म्हणत त्याने चौथ्या सामन्यापूर्वी शाब्दिक युद्ध सुरु केले आहे.

चौथ्या कसोटी सामन्याला चार सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या सामन्यासाठी स्मिथने तयारीला सुरवात केली आहे.  या सामन्यात आर्चरचे चेंडू खेळण्यासाठी त्याच्या फलंदाजीत काही बदल करणार आहे का? असा प्रश्न विचारल्यावर त्याने स्पष्ट शब्दांत नाही असे उत्तर दिले. तो म्हणाला, ''नाही, मी कोणताही बदल करणार नाही. सगळे बोलत होते की आर्चर मला त्या सामन्यात वरचढ ठरला. मात्र, तो मला बाद करु शकला नाही.''

स्मिथला जेव्हा आर्चरचा चेंडू लागला होता तेव्हा त्याला फिल ह्यूजचा विचार मनात आला असल्याचेही स्मिथने सांगितले. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्यूजचे 2014 मध्ये डोक्याला चेंडू लागून निधन झाले होते.

स्मिथ चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यापूर्वी आजपासून सुरु होणाऱ्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात फिटनेस सिद्ध करण्यासाठी खेळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Steve Smith takes a jibe at Jofra Archer before 4th test in Ashes 2019