esakal | या बेल्स पडतच नाहीत; फलंदाज बाद कसा करणार?
sakal

बोलून बातमी शोधा

या बेल्स पडतच नाहीत; फलंदाज बाद कसा करणार?

खेळाडूंची टीका

स्पर्धेत सातत्याने आलेल्या या प्रसंगांमुळे माजी खेळाडू ट्‌विटरच्या माध्यमातून "आयसीसी'वर टीका करू लागले आहेत. एकदा नाही, तर आतापर्यंत पाच वेळा अशा घटना घडल्या आहेत.

या बेल्स पडतच नाहीत; फलंदाज बाद कसा करणार?

sakal_logo
By
सुनंदन लेले

लंडन : क्रिकेटमध्ये सातत्याने बदल केले जात आहेत. त्यातील एक बदल म्हणजे "जिंग बेल्स'चा वापर. बेल्स पडण्याच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी या बेल्सचा वापर करण्यात आला. मात्र, आता या बेल्सच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर समस्या म्हणून उभ्या आहेत. यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत असे अनेक प्रसंग आहेत की अगदी वेगवान गोलंदाजाचा चेंडू लागला तरी या बेल्स पडत नाहीत. 

बेल्सला चेंडू लागला की त्या हलतात आणि ते कळून येण्यासाठी "आयसीसी'ने टणक प्लॅस्टिकच्या पारदर्शी "जिंग' बेल्स निर्माण केल्या. यात एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे चेंडूचा टच झाला की आतील दिवे प्रकाशमान होतात. इथपर्यंत ठिक आहे. पण, त्या इतक्‍या जड झाल्या आहेत की त्या यष्टिवरून खालीच पडत नाहीत. नियमानुसार जोपर्यंत बेल्स खाली पडत नाहीत, तोवर फलंदाजाला बाद दिले जात नाही. त्यामुळे यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील अशा घटनांमुळे खेळाडू हैराण झाले आहेत. 

जिंग बेल्सचा वापर कशासाठी? 

क्रिकेटमध्ये अनेकदा चेंडूचा हलकासा स्पर्श झाला, तरी बेल्स पडत होत्या. अनेकदा हवेमुळे बेल्स पडल्याचा भास होत होता. त्यामुळे पंचांना "रिप्ले' बघूनच निर्णय द्यावा लागत होता. ही समस्या मिटविण्यासाठी टणक प्लॅस्टिक आणि एलईडी दिवे बसवलेल्या "जिंग' बेल्स आल्या. चेंडूचा स्पर्श झाला की आतील दिवे प्रकाशमान होतो. त्यामुळे पंचांना तिसऱ्या पंचाची गरज भासत नाही. पण, या वेळी त्या काही केल्या पडतच नाहीत. इतक्‍या त्या जड झाल्या आहेत. 

खेळाडूंची टीका

स्पर्धेत सातत्याने आलेल्या या प्रसंगांमुळे माजी खेळाडू ट्‌विटरच्या माध्यमातून "आयसीसी'वर टीका करू लागले आहेत. एकदा नाही, तर आतापर्यंत पाच वेळा अशा घटना घडल्या आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्या नंतर प्रतिस्पर्धी कर्णधारांनी थेट प्रतिक्रिया दिली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच म्हणाला, ""आपला फलंदाज वाचला म्हणून आम्हाला हसू आले, पण प्रतिस्पर्धी फलंदाज वाचला असता, तर नक्कीच वाईट वाटले असते. जे चालले आहे ते ठिक नाही.'' कोहलीने तर अशा वेळी फलंदाजाला बाद धरायला पाहिजे, असे मत व्यक्त केले. तो म्हणाला, ""फलंदाजाला चकवून चेंडू जेव्हा बेल्सला स्पर्श करतो तेव्हा दिवे प्रकाशमान होतात. म्हणजे फलंदाज बाद आहे. त्या पडत नाहीत याला गोलंदाजाची काय चूक ? फलंदाजाला अशा वेळी बाद द्यायला हवे.'' 

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्या दरम्यान असलेल्या एका पंचाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेली माहिती विचार करायला लावणारी आहे. हा पंच म्हणाला, ""बेल्स बसविण्यात येण्यासाठी करण्यात आलेल्या खाचा मोठ्या झाल्या आहेत. बेल्स वजन नेहमीसारखेच आहे.'' 

स्पर्धेत अजून साखळी सामने सुरू आहेत. असे प्रसंग उपांत्य किंवा अंतिम फेरीत आल्यास त्याचा मोठा फटका बसू शकतो, यासाठी आयसीसीने या समस्येचे निराकरण करण्याची गरज आहे. 

टी- 20 2016 विश्‍वकरंडक स्पर्धेपासून आम्ही याच बेल्स वापरत आहोत. त्या बनवण्यात कणभरही फरक पडलेला नाही. स्पर्धेचे नियम स्पर्धा सुरू झाल्यावर बदलता येत नाही. आम्ही या प्रसंगाकडे खेळाचा एक भाग म्हणून बघत आहोत. 

- आयसीसीचा एक प्रवक्ता

loading image