अन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर

सिद्धार्थ लाटकर
बुधवार, 16 जानेवारी 2019

महाराष्ट्राच्या पाठीराख्यांनी प्रेक्षा गॅलरीत मोठी गर्दी केली होती. अन् सामना जिंकताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला.

पुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन स्पर्धेतील दूसरा विजय नोंदविताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला.
म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या सामन्यांना मंगळवारपासून (ता.15) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 21 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा 74-67 तर मुलींच्या संघाने गुजरात संघाचा 83-41 असा पराभव केला. आज (बुधवार) स्पर्धेतील दूसऱ्या दिवशी ही महाराष्ट्रच्या मुलींनी उत्तम कामगिरी केली. कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दहा मिनिटांच्या सत्रात महाराष्ट्र संघाने 22-15 अशी सात गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर कर्नाटक संघाने आक्रमणावर भर देत मध्यंतरापर्यंत ही आघाडी 41-36 अशी पाच गुणांपर्यंत आणली.
खेळाच्या तिसऱ्या व चौथ्या सत्रात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अचूक बास्केट नोंदवित पाच ते सहा गुणांची आघाडी कायम ठेवली. महाराष्ट्राने हा सामना 80-74 असा जिंकल्यानंतर प्रेक्षा गॅलरीतून जय महाराष्ट्राचा गजर झाला.
दरम्यान याच गटात चूरशीच्या झालेल्या सामन्यात मुलांच्या संघास केरळ संघाकडून 75-72 असा तीन गुणांनी पराभव स्विकारावा लागला.
सकाळच्या सत्रात 17 वर्षाखालील मुलांच्या संघाचा सामना पंजाब संघाबरोबर होता. महाराष्ट्राच्या पाठीराख्यांनी प्रेक्षा गॅलरीत मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभापासून पंजाबच्या खेळाडूंनी आक्रमणात भर दिली. पहिल्या दहा मिनिटांत पंजबाने 18-12 अशी सहा गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरास ही पंजाबकडे 38-20 अशी 18 गुणांची आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवत पंजाबने हा सामना 72-48 असा जिंकला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supporters cheers or Maharashtra in balewadi