Virat Kohli : विराट @ 50! संगम शक्ती, युक्ती अन् भक्तीचा!

विराट कोहलीला आपण सगळेच ‘चेसमास्टर’ म्हणून गौरवतो. त्यामागचं मुख्य श्रेय हे त्याच्या दडपण हाताळण्याच्या कौशल्याला आहे.
Virat Kohli
Virat KohliSakal

- सुरेंद्र भावे

विराट कोहलीनं बुधवारी (ता. १५) एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० शतकांचा टप्पा गाठला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात असे करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला असून, यासह त्यानं इतरही अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. विराटच्या या यशामागचं रहस्य काय, त्याची कोणती वैशिष्ट्यं त्याला या टप्प्यापर्यंत घेऊन गेली, याविषयी...

विराट कोहलीला आपण सगळेच ‘चेसमास्टर’ म्हणून गौरवतो. त्यामागचं मुख्य श्रेय हे त्याच्या दडपण हाताळण्याच्या कौशल्याला आहे. धावांचा पाठलाग करताना फलंदाजावर दडपण असतं, पण त्या दडपणाशी जणू दोस्ती असावी, इतक्या सहजपणे विराट ते हाताळतो. दडपणाखाली त्याचा खेळ अजूनच बहरत जातो.

अशा परिस्थितीत अनेक फलंदाज चांगली खेळी करतात, पण मोक्याच्या क्षणी विकेट गमावून बसतात. विराट मात्र जवळपास प्रत्येक वेळी नाबाद राहून सामना जिंकवून देतो. त्यासाठी लागणारा अविश्वसनीय असा मानसिक कणखरपणा त्याच्याकडे आहे.

तिन्ही प्रकारांमध्ये तो ‘क्रिकेटिंग शॉट्स’वर, अर्थात तंत्रशुद्ध फटक्यांवर भर देतो. जास्तीत जास्त ‘व्ही’मध्ये खेळणं, सरळ साईटस्क्रीनकडं फटके मारणं यातून तो धावा काढायचा प्रयत्न करतो. उगाच कधीही भलतेसलते फॅन्सी फटके मारण्याचा प्रयत्न करत नाही. एकदिवसीय सामन्यांतील त्याची शतकं पाहिली, तर त्यात मोजकेच षटकार असतात. जमिनीवरून मारलेल्या, पण देखण्या अशा फटक्यांची संख्याच अधिक असते. तरुण खेळाडूंनी ही गोष्ट त्याच्याकडून शिकली पाहिजे.

त्रिवेणी संगम!

१) शक्ती - विराटचं शक्तीचं क्रिकेटमधलं रूप म्हणजे फिटनेस. त्याचं स्वतःच्या फिटनेसकडं प्रचंड लक्ष आहे. आहार कसा असावा, व्यायाम किती असावा, याच्या अचूक नियोजनातून त्यानं आपला फिटनेस सांभाळला आहे. त्यामुळेच मोठी इनिंग खेळल्यानंतर, शतक पूर्ण केल्यानंतरही पहिला चेंडू खेळत असल्याच्या ऊर्जेनंच तो एकेरी-दुहेरी धावांसाठी पळत असतो.

२) युक्ती - क्रिकेट केवळ कौशल्याचा खेळ नाही, तो बुद्धीचाही खेळ आहे. त्या बाबतीतही विराट वरचढ आहे. त्याचा ‘क्रिकेटिंग ब्रेन’ चांगला आहे. परिस्थितीनुसार खेळात कसा बदल करायचा, पहिल्या डावात फलंदाजी करताना काय रणनीती आखायची, धावांचा पाठलाग करताना काय रणनीती आखायची, हे त्याला उत्तमरीत्या कळतं.

३) भक्ती - भक्तीचा अर्थ त्याच्या खेळात असलेलं समर्पण. प्रत्येक सामन्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन १०१ टक्के योगदान देण्याचा तो प्रयत्न करतो.

विराटच्या कारकिर्दीतल्या २०१९ ते २०२२ या कालखंडाबद्दल बरंच बोललं गेलं. या काळात त्याचं एकही शतक नाही, त्यामुळं तो फारसा फॉर्ममध्ये नव्हता, असं म्हटलं जातं. पण जे सांख्यिक गुणवत्ता पाहतात, त्यांच्यासाठी हे सत्य असू शकतं. कारण आपण नीट पाहिल्यास एकदिवसीय आणि टी-२० सामन्यात त्याची १०-१० अर्धशतके आहेत. शिवाय कसोटी क्रिकेटमध्येही ५-६ अर्धशतके आहेत.

जो फलंदाज शतक करत नाही, तो फॉर्ममध्ये नाही, असा समज चाहत्यांमध्ये असतो. विशेषतः शतकांचा रतीब घालणाऱ्या विराटसारख्या खेळाडूकडून नेहमीच या अपेक्षा असतात. मात्र, पावणेतीन वर्षे शतक न करणं, याचा विराटच्या फॉर्मशी विनाकारण संबंध जोडला गेला.

त्यापूर्वी देखील २०१२ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर कसोटी मालिकेत विराटला जेम्स अँडरसननं भंडावून सोडलं होतं. ती मालिका विराटसाठी फारच वाईट ठरली होती, मात्र त्या मालिकेनंतर विराटनं स्वतःमध्ये आंतरिक बदल केले आणि जोमात पुनरागमन करत पुन्हा आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

सकारात्मक दृष्टिकोन

विराट हा क्रिकेटबाबत अतिशय सकारात्मक विचार करणारा खेळाडू आहे. तो खेळाबद्दल चिंता करत नाही, तर चिंतन करतो. माझं शतक का होत नाही, याची चिंता करण्यापेक्षा हेच सामने मला कसे जिंकवून देता येतील, मोठी खेळी कशी करता येईल, याचं त्यानं चिंतन केलं. त्यामुळेच एकदा शतक झाल्यानंतर त्याचं शतकातील सातत्यही परत आलं. कठीण काळातून परत येणं, त्याला उत्तम जमतं.

वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर, वेगवेगळ्या गोलंदाजांसमोर आपला खेळ परिस्थितीनुरूप बदलण्याची कला त्याच्याकडं आहे. संघ अडचणीत आल्यास कशा प्रकारे डाव सावरायचा, हे त्याला अवगत आहे. डाव योग्य वेगानं फुलवत नेण्यात तो पारंगत आहे. त्यामुळेच त्याची भरपूर शतकं झालेली दिसतात.

याआधी म्हटल्याप्रमाणे विराटची ऊर्जा अविश्वसनीय आहे. असं म्हणतात, की महान खेळाडू मैदानावर येतात, तेव्हा त्यांची ऊर्जा दिसून येते. हे विराटच्या बाबतही खरं आहे. केवळ फलंदाजी करतानाच नव्हे तर क्षेत्ररक्षण करताना आपल्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहित करताना प्रत्येक वेळी तो तेवढाच उत्साही आणि ऊर्जादायी असतो. स्वतःमधील आक्रमकता फलंदाजीमध्ये परावर्तित करण्याची क्षमता त्याच्यात आहे. महान क्रिकेटपटूंकडे असणारं संतुलन (मैदानातील आणि मैदानाबाहेरील देखील) त्याच्याकडं आहे.

याच सगळ्या गुणांमुळं आज विराट अवघ्या २९१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५० शतकांपर्यंत पोहोचू शकला आहे. हा त्याच्या कारकिर्दीतील केवळ एक टप्पा असून, अशी अनेक नवनवीन शिखरं त्यानं पादाक्रांत करावीत, याच सदिच्छा.

सचिन आणि विराट

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेट सामन्यांतील ४९ शतकांचा विक्रम मोडून ५० शतके झळकावली. विराटला सचिनच्या ४९ शतकांशी बरोबरी करण्यासाठी तब्बल १७४ सामने कमी खेळावे लागले. सचिनला ४९ शतके करण्यासाठी २२ वर्षे लागली. या विक्रमाची बरोबरी विराटने १५ वर्षे खेळून केली.

विश्‍वकरंडक शतके

सचिन - ६

कोहली - ५

(लेखक माजी क्रिकेटपटू व निवड समिती सदस्य आहेत.)

(शब्दांकन - महिमा ठोंबरे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com