स्वित्झर्लंडने विजयाचे खाते उघडले; एम्बोलोने ज्या कॅमेरूनमध्ये जन्म घेतला त्याचाच केला पराभव | FIFA World Cup 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup 2022 Switzerland Defeat Cameroon

FIFA World Cup 2022 : स्वित्झर्लंडने विजयाचे खाते उघडले; एम्बोलोने ज्या कॅमेरूनमध्ये जन्म घेतला त्याचाच केला पराभव

FIFA World Cup 2022 Switzerland Defeat Cameroon : फिफा वर्ल्डकप 2022 च्या ग्रुप G मधील सामन्यात स्वित्झर्लंडने कॅमेरूनचा 1 - 0 असा पराभव करत वर्ल्डकपमधील आपले विजयाचे खाते उघडले. ब्रील एम्बोलोने सामन्याच्या 48 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल केला. विशेष म्हणजे ब्रीलचा जन्म कॅमेरूनमध्ये झाला आहे. त्यामुळे त्याने गोल केल्यानंतर सेलिब्रेशन करणे टाळले.

First Half : गोलशून्य बरोबरी

फिफा वर्ल्डकप 2022 ग्रुप G मधील स्वित्झर्लंड आणि कॅमेरून या संघातील पहिला हाफ गोलशून्य बरोबरीत राहिला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच दोन्ही संघात सामन्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी चुरस पहायला मिळाली. दोन्ही संघांनी बॉलवर ताबा मिळवण्यात समान प्रयत्न केले. पासिंगच्या बाबतीत स्वित्झर्लंड किंचीत कॅमेरूनपेक्षा वरचढ ठरली. मात्र प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टवर शॉट्स मारण्यात कॅमेरून आघाडीवर होती. त्यांचे दोन शॉट्स ऑन टार्गेट होते. जरससा पहिला हाफ शेवटाकडे येऊ लागला तसतसे स्वत्झर्लंडने आपल्या आक्रमणाची धार वाढवली. मात्र पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले.

Second Half : दोन मिनिटात कोंडी फुटली

दुसऱ्या हाफमध्ये स्वित्झर्लंडने पहिल्या दोन मिनिटातच कॅमेरूनवर गोल डागत 1 - 0 अशी आघाडी घेतली. स्वित्झर्लंडचा मिडफिल्डर शाकिरीने ब्रील एम्बोलोला एक अप्रतिम पास दिला त्यावर एम्बोलोने 48 व्या मिनिटाला गोल करत स्वित्झर्लंडचे गोलचे खाते उघडले. यानंतर कॅमेरूनने आपल्या आक्रमणाची धार वाढवत गोलची परतफेड करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र स्वित्झर्लंडने हा प्रयत्न हाणून पाडला. दरम्यान, स्वित्झर्लंडने देखील आपली 1 - 0 अशी गोलची आघाडी वाढवण्यासाठी कॅमेरूनच्या गोलपोस्टवर चढाया केल्या. मात्र गोलकिपरने या चढाया शिताफीने परतवून लावल्या. अखेर स्वित्झर्लंडने सामना 1 - 0 असा जिंकला.