कोणाला वगळणार : सूर्य, पंत की कार्तिक? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

t20 cricket kl rahul virat kohli Australia rishabh pant dinesh karthik suryakumar yadav

कोणाला वगळणार : सूर्य, पंत की कार्तिक?

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी टी-२० विश्‍वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेआधी भारतीय क्रिकेट संघाची डोकेदुखी वाढली आहे. के. एल. राहुल आणि विराट कोहली यांच्या पुनरागमनानंतर टीम इंडियाच्या मधल्या फळीत कोणाचा पत्ता कट होणार, हा यक्षप्रश्‍न यावेळी निर्माण झाला आहे. गेल्या काही काळात सामन्याला कलाटणी देणारी खेळी करणारा रिषभ पंत, ३६० डिग्रीमध्ये फटके मारणारा सूर्यकुमार यादव आणि फिनीशर म्हणून ओळखला जाणारा दिनेश कार्तिक यांच्यापैकी एकाला अंतिम अकरामधून बाहेर जावे लागण्याची शक्यता या वेळी निर्माण झाली आहे.

विराट फिट आहे आणि तो संघासाठी उपलब्धही आहे. मात्र गेल्या दशकामध्ये पहिल्यांदाच असे घडत आहे की, त्याच्या भारतीय संघातील स्थानाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील टी-२० विश्‍वकरंडकानंतर आतापर्यंतच्या कालावधीत विराट फक्त चार टी-२० सामने खेळला आहे. यामध्ये त्याने १७, ५२, १ व ११ अशा धावा केल्या. तसेच दुखापत व कोरोनाची लागण यामधून बाहेर आलेला राहुल आशियाई करंडकाने पुनरागमन करणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये तो धावांचा पाऊस पाडतो. पण त्याच्या फलंदाजीत एक त्रुटी आहे. तो सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजीचा गिअर बदलत नाही. अखेरच्या षटकांमध्ये तो टी-२० क्रिकेटला साजेशी फलंदाजी करतो. सुरुवातीला विशिष्ट स्ट्राईकरेटने फलंदाजी करणाऱ्या विराट व राहुलला मागील पुण्याईच्या जोरावर संघात एकाच वेळी स्थान देण्यात येईल का, हा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर असेल.

पाच फलंदाज संघात

कर्णधार रोहित, राहुल व विराट या तीन फलंदाजांना सुरुवातीच्या तीन क्रमांकावर खेळवल्यास पुढील दोन स्थानांसाठी सूर्यकुमार यादव, रिषभ पंत व दिनेश कार्तिक यांच्यामध्ये चुरस असेल. शिवाय आणखी काही खेळाडू शर्यतीत आहेत. याचाच अर्थ कर्णधार वगळता चार जागांसाठी टीम इंडियामध्ये रस्सीखेच दिसून येत आहे.

चार गोलंदाज अन्‌ दोन अष्टपैलू

भारतीय संघात दोन अष्टपैलू खेळाडू असणार हे निश्‍चित आहे. हार्दिक पंड्या व रवींद्र जडेजा या दोन अष्टपैलू खेळाडूंना संघात स्थान दिले जाईल. तसेच टी-२० क्रिकेटमध्ये चार अव्वल गोलंदाज हवेत. त्यामध्ये फेरफार करून चालणार नाही. त्यामुळे सहा जागा दोन अष्टपैलू व चार गोलंदाज यामध्येच निश्‍चित होणार आहेत.

आशियाई करंडक ठरणार महत्त्वाचा

भारतीय संघ टी-२० विश्‍वकरंडकाआधी आशियाई करंडक, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. टीम इंडियासाठी या मालिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारतीय संघ कोणत्या समीकरणासह मैदानात उतरेल, हे या मालिकांद्वारे समजेल.