esakal | T20 World cup 2021 : विश्वकरंडक संघात बदल होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

team india
T20 World cup 2021 : विश्वकरंडक संघात बदल होणार?

T20 World cup 2021 : विश्वकरंडक संघात बदल होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघातील खेळाडूंची अंतिम नावे पाठवताना बदल होऊ शकतो. यापूर्वी १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र, ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाला (आयसीसी) अंतिम १५ नावे कळविण्यासाठी दहा ऑक्टोबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे भारतीय नियामक क्रिकेट मंडळाकडून आयसीसीला नावे पाठवताना ऐनवेळी संघात बदल केला जाऊ शकतो.

अधिक माहितीनुसार, चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी याबाबत अंतिम चर्चा करून निर्णय घेणार आहेत. शनिवारी दुबईमध्ये होणाऱ्या शास्त्री आणि कोहली यांच्यासोबच्या या बैठकीस चेतन शर्मांसोबत जय शहाही हजेरी लावणार असल्याचे समजते. यावेळी काही नावांवर चर्चा होऊन त्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो.

हार्दिक पंड्याची तंदुरुस्ती व गोलंदाजीसाठी उपलब्ध नाही, हा विषय बैठकीच्या अजेंड्यावर असू शकतो. आयपीएल दुसऱ्या सत्रामध्ये मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू पंड्या अजूनही गोलंदाजी करताना दिसला नाही. त्यामुळे निवड समितीचे सदस्यही या विषयावर विचार करत आहेत. जरी त्याला अष्टपैलू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आले असले तरी, हार्दिक विश्वकरंडकामध्ये किती महत्त्वाची भूमिका बजावू शकतो यावर मंडळ फेरविचार करणार आहे. तर दुसरीकडे यापूर्वी जाहीर झालेल्या संघात निवड न झालेला युझवेंद्र चहल सध्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. यापूर्वीच्या संघात राखीव खेळाडू म्हणूनही स्थान मिळवू न शकलेल्या चहलला ऐनवेळी परत बोलावण्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

चहलची आयपीएलमधील कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनेही ट्विट केले आहे. त्यामध्‍ये भज्जी लिहितो, ‘तू(चहल) तुझे सर्वोत्तम देत आहेस. अशीच गोलंदाजी करत, बहारदार कामगिरी चालू ठेव. मला अजूनही तू ट्वेन्टी-२० विश्वकरंडक संघात दिसण्याची आशा आहे.’ यासह इशान किशन ऐवजी श्रेयस अय्यरच्या नावाचाही विचार चालू असल्याची माहिती आहे. त्यामुळे संघात अखेरच्यावेळी कुठले बदल होतात याबाबत औत्सुक्य लागले आहे.

loading image
go to top