esakal | मनिका बत्रा पाच महिने का गप्प राहिली?
sakal

बोलून बातमी शोधा

मनिका बत्रा पाच महिने का गप्प राहिली?

मनिका बत्रा पाच महिने का गप्प राहिली?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑलिंपिक पात्रता स्पर्धेतील सामना जाणीवपूर्वक पराभूत व्हायला सांगितल्याचा सनसनाटी आरोप राष्ट्रीय प्रशिक्षकांवर करणाऱ्या मनिका बत्रालाच भारतीय टेबल टेनिस फेडरेशनने प्रतिप्रश्न केला आहे. ऑगस्टमध्ये कारणे दाखवा नोटीस दिल्यानंतर मनिकाने आता हे आरोप केले आहेत. ‘ती घटना मार्चमध्ये घडली असे तिचे म्हणणे आहे, मग ही माहिती उघड करण्यास इतके दिवस का घेतले,’ असे फेडरेशनने म्हटले आहे.

ऑलिंपिक स्पर्धेत आतापर्यंत तिसरी फेरी गाठणे भारताच्या कोणत्याही टेबल टेनिसपटूला जमलेले नाही. ते मनिकाने टोकियो ऑलिंपिकमध्ये करून दाखवले, पण तिने या प्रवासात राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांना सोबत घेतले नव्हते. यावरून बराच वाद झाला होता. या प्रकाराबद्दल टेबल टेनिस फेडरेशनने मनिकाला मायदेशी परतताच कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटिशीला उत्तर देताना मनिकाने शिस्तभंगाचे सर्व आरोप फेटाळले आणि रॉय यांच्यावरच तोफ डागली. मार्च महिन्यात दोहा येथे झालेल्या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत त्यांच्या शिष्येविरुद्धचा सामना हरण्यास रॉय यांनी सांगितल्याचा सनसनाटी आरोप मनिकाने केला.

यासंदर्भात बोलताना टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस अरुण बॅनर्जी म्हणाले, ‘मनिकाच्या या आरोपांबाबत खुलासा करण्यासाठी रॉय यांना सांगितले आहे. सोमवारपर्यंत ते आपले उत्तर देणार आहेत.’ ‘फेडरेशन नेहमीच खेळाडूंचे हित जपत असते. सर्वांपेक्षा आम्ही खेळाडूंना अधिक प्राधान्य देत असतो. त्यामुळे मनिकाने टोकियो ऑलिंपिकसाठी तिने वैयक्तिक प्रशिक्षक आपल्या सोबत असण्याची मागणी केली, ती आम्ही लगेच मान्य केली. जी. साथियनबाबतही आम्ही हाच निर्णय घेतला होता. वैयक्तिक प्रशिक्षक सोबत असल्यावर कामगिरी उंचावर असेल तर आम्ही त्यालाच प्राधान्य देणार,’ असे बॅनर्जी म्हणाले.

परंतु टोकियो ऑलिंपिक संघटनेने वैयक्तिक प्रशिक्षकांना ‘पी’ श्रेणीचे अॅक्रिडिएशन दिले होते आणि श्रेणीच्या प्रशिक्षकांना कोर्टवर प्रवेश नव्हता असेही बॅनर्जी यांनी सांगितले. ‘रॉय यांनी जर तिला सामना फिक्स करायला सांगितले होते, तर ही माहिती उघड करण्यास मनिकाने पाच महिने का वाट पाहिली. इतके दिवस ती का गप्प राहिली, तसे करण्यास तिच्यावर कोणाचे दडपण होते का,’ असेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

loading image
go to top