अखेरच्या चढाईत तमीळ थलैवाजची बरोबरी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 August 2019

सामन्यातील अखेरच्या चढाईत मनजीतची पकड करीत विनित शर्माने पकड केली. त्यामुळे तमीळ थलैवाजने प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटनला 31-31 असे बरोबरीत रोखले.

चेन्नई : सामन्यातील अखेरच्या चढाईत मनजीतची पकड करीत विनित शर्माने पकड केली. त्यामुळे तमीळ थलैवाजने प्रो कबड्डी लीगमध्ये पुणेरी पलटनला 31-31 असे बरोबरीत रोखले.

पुणेरी पलटनच्या सूरजीत सिंगने पकडीत सात गुण करताना डू आर डाय सुपर टॅकलची स्पर्धेतील दशकपूर्ती केली; पण अजित कुमार आणि राहुल चौधरीच्या चढायांतील आठ गुण तसेच विनित शर्माच्या पकडींनी तमीळला हार टाळता आली. पुण्याने चांगली कामगिरी केली होती; पण नितिन तोमरला अपेक्षित यश लाभले नाही. त्याला बारा चढाईत पाचच गुण मिळवता आले.

हरियाना स्टीलर्सची विजयी मालिका अखेर तेलुगु टायटन्सविरुद्ध संपुष्टात आली. हरियाणाला 29-40 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली. विकास कंडोलाने पहिल्याच चढाईत गुण घेत हरियाणाला चांगली सुरुवात करून दिली; पण त्यानंतर सूरज आणि सिद्धार्थ या देसाईद्वयीने हरियाणाचा बचाव खिळखिळा केला. त्यामुळे तेलुगूने विश्रांतीस 21-13 वर्चस्व राखले.

उत्तरार्धात विकासला मैदानाबाहेर ठेवण्यात तेलुगुला यश आले. त्यामुळे दडपणाखाली हरियाणाकडून चुका झाल्या. त्यांची पिछाडी 16 गुणांवर गेली. तेलुगुने त्यानंतर सावध खेळ करीत विजय निसटू दिला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamil thailwas hold puneri paltan in last raid