अखेर मुहूर्त ठरला; 'टीम इंडिया'च्या नव्या प्रशिक्षकाची निवड पुढील आठवड्यात!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

प्रशिक्षक निवड प्रक्रिया पुढे नेण्यास 'बीसीसीआय'च्या कायदा समितीने परवानगी दिल्यामुळे लवकरच भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल, असे 'बीसीसीआय'वरील प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या नव्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. कपिलदेव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांची सल्लागार समिती पुढील आठवड्यात भारताच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा करेल. 

प्रशिक्षक निवड प्रक्रिया पुढे नेण्यास 'बीसीसीआय'च्या कायदा समितीने परवानगी दिल्यामुळे लवकरच भारतीय संघाला नवा प्रशिक्षक मिळेल, असे 'बीसीसीआय'वरील प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले. भारतीय संघाच्या प्रशिक्षकच नाही, तर सपोर्ट स्टाफचीही नियुक्ती ही समिती करणार आहे. जबाबदारीच्या प्रशिक्षकाच्या मुख्य जागेसाठी फारसे अर्ज आले नसले, तरी 'बीसीसीआय'ने प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी दिलेल्या जाहिरातीनंतर एकूण तब्बल दोन हजार अर्ज 'बीसीसीआय'कडे आले आहेत. 

26 राज्य संघटना एकत्र 
'बीसीसीआय'च्या 22 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या निवडणूकीविषयी माहिती देताना राय यांनी 26 राज्य संघटनांनी लोढा समितीच्या सर्व शिफारशी स्वीकारल्या असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती देखील केल्याची माहिती दिली. या 26 राज्य संघटनांनी आपल्या निवडणुकांच्या तारखादेखील जाहीर केल्या आहेत. आणखी चार राज्य संघटना रांगेत आहेत; पण त्यांनी अजून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही, असेही राय यांनी सांगितले.

ज्या राज्य संघटना लोढा शिफारसी मान्य करून आपल्या निवडणुका घेतील, त्यांनाच 'बीसीसीआय'च्या निवडणुकीच मतदानाचा अधिकार असेल, असेही राय यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Team Indias new coach selection held in next week of August