टेनिसपटू ऋतुजा भोसलेची द्वितीय मानांकित लूवर मात 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

भारताच्या ऋतुजा भोसलेने आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूर स्पर्धेच्या एकेरीत उपांत्यपूर्व, तर दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. एकेरीत तिने द्वितीय मानांकित चीनच्या जिया जुंग लू हिला 6-4, 7-5 असे हरविले.

नॉंथाबुरी (थायलंड) - भारताच्या ऋतुजा भोसलेने आयटीएफ वर्ल्ड टेनिस टूर स्पर्धेच्या एकेरीत उपांत्यपूर्व, तर दुहेरीत उपांत्य फेरी गाठली. एकेरीत तिने द्वितीय मानांकित चीनच्या जिया जुंग लू हिला 6-4, 7-5 असे हरविले. जागतिक क्रमवारीत लू 190व्या, तर ऋतुजा 415व्या क्रमांकावर आहे. आधीच्या दोन सामन्यांत भारतात ती लू हिच्याकडून दोन वेळा हरली होती. 

सकारात्मक दृष्टिकोनाचा प्रयत्न  
ऋतुजा यंदा 14 स्पर्धांत एकेरीमध्ये सहा वेळा पहिल्या फेरीत हरली होती. अशावेळी क्रमवारीत दुपटीपेक्षा जास्त फरक असूनही विजय मिळविणे ऋतुजासाठी महत्त्वाचे ठरले. व्हॉट्‌सऍप कॉलवर संपर्क साधला असता ऋतुजाने सांगितले की, पावसामुळे या लढतीत पाच वेळा व्यत्यय आला. त्यामुळे एकाग्रता राखणे अवघड होते. दुसऱ्या सेटमध्ये मी 5-4 अशा आघाडीस काहीशी दडपणाखाली आले. आधीच्या फेऱ्यांत हुकलेले विजय मला आठवत होते. तरीही मी शक्‍य तेवढा सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. मी हुकमी फटके मारायचे ठरविले. त्याचा फायदा झाला. लू भारतात येऊन बरीच खेळली आहे. 

दुहेरीत ऋतुजाने जपानच्या माना आयुकावा हिच्या साथीत भाग घेतला आहे. त्यांनी पहिल्या फेरीत थायलंडच्या अनुचीसा चांता-केयूआरुम सुपाप्तीच यांना 6-0, 7-6 (7-2), तर उपांत्यपूर्व फेरीत लोऊ ब्रोयूलेयू (फ्रान्स)-पुन्नीन कोवापितुक्तेद (थायलंड) यांना 5-7, 6-2, 10-6 असे हरविले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tennis player Rituja Bhosale

टॅग्स